नवी दिल्ली, 15 मार्च : विमान प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेबाबत दिल्ली महिला आयोगानं आता कठोर भूमिका घेतली आहे. विमान प्रवासादरम्यान पुरुष सहप्रवाश्यानं दारूच्या नशेत महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी घडलं होतं. तसंच काही महिलांना विमान प्रवासात लैंगिक अत्याचाराचाही सामना करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता दिल्ली महिला आयोगानं विमान प्रवासातील हे गैरप्रकार थांबावेत यासाठी डीजीसीएकडे (Directorate General Of Civil Aviation) काही शिफारशी केल्या आहेत.
दिल्ली महिला आयोगानं (DCW) डीजीसीएला एक पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या अशा प्रकारच्या घटना अत्यंत चुकीच्या आणि निंदनीय होत्या, असं आयोगानं पत्रात म्हटलं आहे. त्यात आयोगानं लघुशंका केल्याच्या घटनेचाही उल्लेख केला आहे. आयोगानं या सर्व घटनांची माहिती घेऊन डीजीसीएला नोटीस पाठवून तपशील मागवून घेतला.
DCWनं DGCAला लिहिलेल्या पत्रात काय शिफारसी आहेत?
मद्यपान
- खूप नशा केलेल्या व्यक्तींना विमानात प्रवेश देऊ नये.
- विमान प्रवासात एखाद्या व्यक्तीनं जास्त दारू प्यायली तर त्या व्यक्तीला सांभाळण्यासाठी प्रोटोकॉल विकसित करावा.
- विमानात दारू पिण्यावर मर्यादा असावी.
- आरोपीवर एफआरआय दाखल करण्यात यावा.
- सर्व विमानांमध्ये सीसीटीव्ही लावावे.
- अशा घटनांमध्ये विमानातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवावी.
- विमानात अलार्मची सोय असावी.
वाचा - मुलीला वाचवण्यासाठी आई रानडुकरांशी 30 मिनिटे लढली, पण शेवट भयानक झाला
लैंगिक अत्याचार
- विमानातील शारीरिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालावा व त्यांचा रिपोर्ट सादर करावा.
- विमान प्रवासात लैंगिक छळ करणाऱ्याची शिक्षा वाढवावी.
- अशा घटना हाताळण्यासाठी प्रोटोकॉल विकसित करावा.
- लैंगिक छळवणुकीच्या गुन्ह्यासाठी स्वतंत्र श्रेणी स्थापन करावी.
- लैंगिक छळाची प्रकरणं व प्रवाशांशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणांबाबत चौकशी करण्यासाठी वेगळी समिती नेमावी.
- एकटी महिला प्रवासी असेल, तर तिच्या शेजारी महिलेलाच सीट देण्याचा पर्याय असावा.
- विमानांमध्ये लैंगिक अत्याचाराच्याविरुद्ध जाहीर घोषणा कराव्यात व पत्रकं वाटावीत.
- विमानतळांवर जनजागृती करण्यासाठी पोस्टर लावावीत.
- छळात सहभागी असल्यास विमान कंपनी आणि त्यांच्या केबिन क्रूमधील सदस्यांवर कारवाई केली जावी.
आयोगानं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करायच्या सुधारणांबाबत काही शिफारसी केल्या आहेत. याद्वारे विमानात किंवा विमानतळावर घडणाऱ्या अशा घटना व्यवस्थित हाताळता येतील. डीजीसीएनं या शिफारसींवर काय विचार केला व अशा प्रकारच्या घटनांबाबत काय कारवाई केली याचा अहवाल 30 दिवसांच्या आत द्यावा अशी मागणी दिल्ली महिला आयोगानं केली आहे. दिल्ली महिला आयोगानं केलेल्या शिफारसींना डीजीसीए काय उत्तर देतं, हे लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Travel by flight