Home /News /national /

‘तृणमूल’ला मोठा हादरा, ममतांचे विश्वासू शुभेंदू अधिकरी आणि 11 आमदार शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

‘तृणमूल’ला मोठा हादरा, ममतांचे विश्वासू शुभेंदू अधिकरी आणि 11 आमदार शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये

अधिकारी यांच्यासोबत 11 आमदार आणि काही माजी खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यात तृणमूल, काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे.

    मिदनापूर 19 डिसेंबर: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला (TMC) जोरदार हादरा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिढ्ढी दिली आहे. त्यात आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासातले समजले जाणारे शुभेंदू अधिकारी(Suvendu Adhikari) यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत मिदनापूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अधिकारी यांच्यासोबत तृणमूलच्या काही आजी-माजी आमदारांनीही पक्षात प्रवेश केला आहे. अधिकारी यांचा भाजप प्रवेश हा बंगालामध्ये तृणमूलला मोठा हादरा मानला जातोय. अधिकारी यांच्यासोबत 11 आमदार आणि काही माजी खासदारांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. यात  तृणमूल, काँग्रेस आणि काही डाव्या पक्षांच्या आमदारांचाही समावेश आहे. ऐकेकाळी अधिकारी हे ममतांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मंत्रिपदाचा आणि तृणमूलच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. अंतर्गत वाद आणि पक्षातल्या एकाधिकारशाहीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. काही वर्षांपूर्वी गाजलेल्या सिंगूर आंदोलनात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्या आंदोलनामुळेच त्यांना खरी ओळख मिळाली होती. भाजपने त्यांना आपल्याकडे खेचून बंगालमध्ये योग्य तो संदेश दिला असून तृणमूलला धक्का दिला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे असं सांगत अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेस, कम्युनिष्ट आणि तृणमूलला संधी दिली आणि एक संधी भाजपला द्या,  भाजप बंगालला सुवर्ण भूमी बनवेल असंही ते म्हणाले.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या