अहमदाबाद 8 फेब्रुवारी : प्रेमवीरांसाठी फेब्रुवारीचा दुसरा आठवडा नेहमीच खास असतो. कारण, हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) म्हणून साजरा केला जातो. याकाळात एकमेकांना काही ना काही स्पेशल गिफ्ट दिले जातात. मात्र, काँग्रेसच्या (Congress) एका नेत्यानं आपल्या गर्लफ्रेंडला दिलेल्या गिफ्टची सगळीकडंच चर्चा रंगली आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की चर्चा रंगण्यासारखं नेमकं कोणतं गिफ्ट या नेत्यानं दिलं असावं. तर, हे गिफ्ट दुसरं तिसरं काही नसून थेट निवडणुकीचं तिकीट आहे.
या महिन्याच्या अखेरीस अहमदाबादमध्ये महानगरपालिका निवडणुकीची (AMC) तयारी सुरू आहे. काँग्रेसनं शेवटच्या क्षणी या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. अधिकृत यादी जाहीर करण्यापूर्वी उमेदवारांना दूरध्वनीवरून थेट माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, यात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यानं थेट आपल्या गर्लफ्रेंडला हे तिकीट मिळवून दिलं.
आजकाल अहमदाबाद काँग्रेसच्या कार्यालयात अशी चर्चा सुरू आहे, की एक वरिष्ठ नेता प्रेमात आहे. असं म्हटलं जात आहे, की त्यांनी व्हॅलेंटाईन डेपूर्वी आपल्या प्रेयसीला एक खास भेट दिली. नेत्याने आपल्या गर्लफ्रेंडला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटपर्यंत उमेदवारांच्या नावाचा उल्लेख केला गेला नव्हता आणि शेवटी स्थानिक नगरसेवक आपल्या गर्लफ्रेंडला तिकीट मिळवून देण्यात यशस्वी ठरले.
गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये एएमसी अंतर्गत गोटा, चांदलोडिया, राणीप, नवा वदज, घाटलोडिया, थलतेज, नारायणपुरा, नरोदा, नवरंगपुरा आणि वसना प्रभागातील उमेदवारांची नावे आहेत. १ फेब्रुवारीला काँग्रेसनं सूरत, वडोदरा, राजकोट, जामनगर आणि भावनगर महानगरपालिकांच्या काही प्रभागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. 6 महानगरपालिकांच्या निवडणुका २१ फेब्रुवारी रोजी होणार असून 28 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 28 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Election, Valentine day, Valentine week