जम्मू आणि काश्मीरातल्या 'हवाई दला'च्या तळांवर हल्ल्याची शक्यता? सतर्कतेचे आदेश

जम्मू आणि काश्मीरातल्या 'हवाई दला'च्या तळांवर हल्ल्याची शक्यता? सतर्कतेचे आदेश

दहशतवाद्यांकडून हवाई दलाच्या दोन तळांचे नकाशे जप्त करण्यात आले होते त्यानंतर लष्कर सज्ज झालं आहे.

  • Share this:

श्रीनगर 17 मे : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडे हवाई दलाच्या तळांचे नकाशे सापडल्याने अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. भारताच्या बालाकोट इथल्या हवाई हल्ल्यानंतर दहशतवादी मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती गुप्तचर संस्थांनाही मिळाली होती.

सुरक्षा दलांनी गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये काही अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून हवाई दलाच्या दोन तळांचे नकाशे जप्त करण्यात आले होते. श्रीनगर आणि अवंतीपूर इथल्या तळांचे हाताने काढलेले नकाशे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

या घटनेची दखल सुरक्षा दलांनी गांभीर्याने घेतली असून दहशतवाद्यांची हल्ल्याची योजना हाणून पाडण्यासाठी सर्व काळजी घेण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर पोलीस, निमलष्करी दलं आणि लष्करांच्या सर्व विभागांमध्ये समन्वय असून सर्व माहितीचं विश्लेषण आणि उपाययोजना करण्यात येत आहेत अशी माहितीही लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे.

भारताने बालोकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा लष्करी तळ उद्धवस्त झाला होता. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानला धक्का बसला होता. तर जगानेही त्याची दखल घेतली होती. त्यामुळे लष्कर आणि सुरक्षा दलं खास काळजी घेत आहेत.

ISJKच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दलाने  काही दिवसांपूर्वीच ISJKच्या कमांडरचा खात्मा केला होता. त्यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे. शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलानं पहाटे परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.

या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव इशाक सोफी (अब्दुल्ला) असून तो सोपोरमधील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर संघटनेचा कमांडर असल्याचंही म्हटलं जात आहे.

First published: May 17, 2019, 10:06 PM IST

ताज्या बातम्या