लखनऊ, 12 जानेवारी: उत्तर प्रदेशच्या निवडणुका (UP Assembly Elections) तोंडावर आल्या असताना भाजपला (BJP) दुसरा मोठा धक्का (Second Jolt) बसला आहे. भाजपमधील ओबीसी नेते (OBC Leader) आणि कॅबिेनेट मंत्री (Cabinet Minister) दारा सिंह चौहान (Dara Singh Chouhan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर भाजपला बसलेला हा सलग दुसरा मोठा धक्का आहे. चौहान यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
राजीनाम्यात दिलं हे कारण
योगी आदित्यनाथ यांच्या कॅबिनेटमध्ये वने आणि पर्यावरण खात्याची जबाबदारी आपण समर्थपणे सांभाळली, मात्र सरकारचं मागासवर्गीय, वंचित आणि शोषितांविषयी असलेलं धोरण पाहता यापेक्षा अधिक काळ आपण या सरकारमध्ये राहू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. सुशिक्षित बेरोजगारांची होणारी अवहेलना हे आपलं सर्वात मोठं दुःख असून त्यामुळेच आपण सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. याशिवाय मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दुसरे ओबीसी नेते
योगी आदित्यनाथ सरकारमधून बाहेर पडणारे दारा सिंह चौहान हे दुसरे मोठे ओबीसी नेते ठरले आहेत. नुकताच स्वामी प्रसाद मौर्य यांनीदेखील पदाचा राजीनामा देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. चौहान यांनी 2015 साली बहुजन समाज पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपमध्ये त्यांना ओबीसी मोर्चाच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यापूर्वी बसपात असताना 2009 ते 2014 या कालावधीत ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले होते. 2017 साली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना राज्यात मंत्रिपद देण्यात आलं होतं.
हे वाचा -
उपमुख्यमंत्र्यांचं ट्विट
बुडत्या नावेत प्रवेश करण्याचा काही नेत्यांचा निर्णय या दुःखद आणि दुर्दैवी असल्याचं ट्विट उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.