आक्रमक शेतकरी आज संसदेवर धडकणार, सरकार दखल घेणार?

संसदेचं 21 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीनं राष्ट्रपतींकडं केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2018 08:30 AM IST

आक्रमक शेतकरी आज संसदेवर धडकणार, सरकार दखल घेणार?

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : दिल्लीत जमलेले हजारो शेतकरी आज संसदेवर धडकणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणार आहे. सध्या हे शेतकरी दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये आहेत.

दिल्लीत आंदोलनात आँध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पश्चिम बंगालमधून हजारो शेतकरी दाखल झाले आहेत.

संसदेचं 21 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं, अशी मागणी किसान संघर्ष समन्वय समितीनं राष्ट्रपतींकडं केली आहे. तसंच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी, महाग शिक्षण आणि आरोग्यसेवांमुळं वाढलेला कर्जाचा बोजा, कर्जामुळं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढते जलसंकट, महिला शेतकऱ्यांचे अधिकार, शहरांकडं स्थलांतर करणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांचे प्रश्न, शेतीचे भविष्य अशा सात विषयांवर संसदेत प्रत्येकी तीन दिवस चर्चा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात वृद्ध शेतकऱ्यांपासून ते त्यांची शाळकरी मुलंही सहभागी झालेली पाहायला मिळत आहेत.संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव अशी या शेतकऱ्याच्या प्रमुख मागणी आहे.

शेतकऱ्यांकडून 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला संसद मार्चचं आयोजन करण्यात आलंय. आम्हाला संसदेकडे जाण्यापासून रोखलं तर आम्ही इतर मार्गांचा अवलंब करू, असा इशारा या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Loading...

या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी म्हटलंय की, 'आम्हाला शुक्रवारी संसद भवनाकडे जाऊ न दिल्यास आम्ही नग्न होऊन मार्च करू.' तामिळनाडूतील शेतकरी आत्महत्या केलेल्या आपल्या शेतकरी साथीदारांच्या कवटी घेऊन आले आहेत. यातून शेतकऱ्यांमधील टोकाच्या भावनेचा अंदाज येऊ शकतो.

गेल्या काही काळापासून शेती हा किफायतशीर व्यवसाय राहिला नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये ही उद्विग्नता दिसत आहे. 30 नोव्हेंबरला किसान सभेच्या दोन सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. पहिल्या सत्रात शेतकरी नेते शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करतील, तर दुसऱ्या सत्रात विविध संघटनांचे नेते शेतकऱ्यांना संबोधित करतील.

काही दिवसांपूर्वीदेखील शेतकऱ्यांनी दिल्लीला धडक दिली होती. मात्र तेव्हा शेतकऱ्यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसंच जमावाला पांगवण्यासाठी पाण्याचा वापर करण्यात आला.


VIDEO : '...आता संघटनेत फूट पडू देऊ नका', अजित पवारांचं मराठा मोर्चेकऱ्यांना आवाहन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2018 08:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...