मराठी बातम्या /बातम्या /देश /

अजबच! कलाकारानं स्वतःच्या शरीरावरच्या बॅक्टेरियापासून तयार केले दागिने

अजबच! कलाकारानं स्वतःच्या शरीरावरच्या बॅक्टेरियापासून तयार केले दागिने

व्हायरल न्यूज

व्हायरल न्यूज

एका डिझायनरने सूक्ष्मजीवांपासून वेगळे रंग विकसित करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार केले आहेत. काय आहे हा प्रकार जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

 मुंबई, 06 ऑक्टोबर:  बहुसंख्य जणांना बॅक्टेरिया अर्थात जीवाणूंचा नुसता उल्लेख देखील किळसवाणा वाटतो. परंतु, एका स्कॉटिश कलाकाराने दागिने बनवण्यासाठी चक्क जीवाणूंचा वापर केला आहे. क्लोई फिट्झपॅट्रिक  नावाच्या एका डिझायनरने सूक्ष्मजीवांपासून वेगळे रंग विकसित करून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने तयार केले आहेत. यासाठी फिट्झपॅट्रिकनं वनस्पतींवरच्या, तसंच तिच्या स्वतःच्या शरीरावरच्या जीवाणूंचा वापर केला आहे. 'मी जीवाणूंचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करत आहे', असं तिने बीबीसी स्कॉटलंडशी बोलताना सांगितलं. तिचा हा प्रयोग नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. तिने या प्रकल्पाविषयीची माहिती टिक टॉकवर व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे. तिचा हा अनोखा उपक्रम पाहून तिच्या फॉलोअर्सची संख्या वेगानं वाढली आहे.

तिने जिथे शिक्षण घेतलं, ती डंडी युनिव्हर्सिटी आणि जेम्स हॅटन इन्स्टिट्यूटमधल्या शास्त्रज्ञांच्या सहकार्यानं फिट्झपॅट्रिकने रंगीबेरंगी जीवाणूंचं अगार माध्यमात संगोपन केलं. एकदा जीवाणूंच्या वसाहती वाढल्या, की ती तिला आवडणारे रंग निवडायची आणि त्या वसाहती ताज्या अगार पेट्री डिशमध्ये ठेवायची. फिट्झपॅट्रिक दागिने किंवा कपड्यांना रंग देण्याकरिता वापरण्यापूर्वी या वसाहतींची एक आठवडा पूर्ण वाढ होऊ देत असे. 'एकदा रंगीत वसाहती वाढल्या की यूव्ही रेझिन त्या प्लेटवर ओतलं जात असे. त्यानंतर ते मिक्स केलं जात असे आणि रबर मोल्डमध्ये ग्लॉसने सील केलं जात असे', असं इन्स्टिट्यूटतर्फे सांगण्यात आलं.

हेही वाचा - VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले

शरीराच्या निरनिराळ्या भागांतले जीवाणू वेगवेगळे रंग तयार करतात, असं फिट्झपॅट्रिकला दिसून आलं. तिने तिच्या पायावर वाढलेल्या जीवाणूंचा वापर करून गुलाबी रंग विकसित केला आणि डोळ्यांच्या पापण्यांतल्या जिवाणूंमधून केशरी रंग विकसित झाला. या रंगांचा वापर करून ती राळेपासून रत्नं, तसंच अंगठीसारखे इतर दागिने तयार करू शकली.

डंडी युनिव्हर्सिटी आणि जेम्स हॅटन इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याव्यतिरिक्त फिट्झपॅट्रिकने तिचा संपूर्ण प्रवास टिकटॉकवरून शेअर केला. तिच्या फॉलोअर्सची संख्या 1,06,000 आहे. तिच्या काही व्हिडिओजना तर 10 दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अशा प्रकारे दागिने बनविण्याव्यतिरिक्त फिट्झपॅट्रिकने दुर्लक्षित जीवाणूंची उपयुक्तता समजण्यास मदत व्हावी यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे. `जीवाणू आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहेत; मात्र त्यांच्याबद्दल क्वचितच विचार केला जाताना दिसतो. सूक्ष्म जीवांमध्ये रासायनिक रंग आणि रंगद्रव्यांसाठी पर्यावरणपूरक पर्याय म्हणून काम करण्याची प्रचंड क्षमता आहे,` असं फिट्झपॅट्रिकने सांगितलं.

First published:

Tags: Viral news