गाझियाबाद, 11 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील सिहानी गेट येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. गाझियाबादच्या सिहानी गेट येथील शाळेत प्रिन्स नावाचा विद्यार्थी आठवीच्या वर्गात शिकत होता. दरम्यान शालेय प्रशासनाने फीसाठी तगादा लावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. प्रिन्सच्या पालकांनी शालेय प्रशासनावर याबाबत गंभीर आरोप लावत पोलिसांत तक्रार दिली आहे.
प्रिन्सच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो नेहमीप्रमाणे शाळेत जात होता. मात्र पैशाअभावी शाळेची फी जमा न झाल्याने फीसाठी वारंवार त्याला त्रास दिला जात होता, फी न भरल्याबद्दल वर्गात विद्यार्थ्यांसमोर शिवीगाळ व मारहाण केली जायची. याकारणावरून त्यामुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा : प्रेमप्रकरणातून भिवंडीतल्या युवकाची घृणास्पद हत्या, कारण ऐकून व्हाल हैराण
प्रिन्ससोबत शिकलेल्या विद्यार्थ्यांचेही म्हणणे आहे की, फीसाठी त्याचा अनेकवेळा छळ करण्यात आला. एवढेच नाही तर सहकारी विद्यार्थ्यांसमोर त्याला वाईट वागणूक दिली जात असे. त्यामुळे तणावाला कंटाळून त्यांने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
प्रिन्सच्या या धक्कादायक घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण असून शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सोबतच त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार पोलिसांकडे दिली आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! राज्यातील 'हे' शहर बनतय क्राईम कॅपिटल; एकाच आठवड्यात सहा खून
या संपूर्ण प्रकरणात नातेवाइकांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शाळा व्यवस्थापन आणि एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकशीनंतरही कायदेशीर कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत गाझियाबादचे ग्रामीणचे एसपी इराज राजा म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे, आरोप खरे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. दरम्यान प्रिन्सच्या कुटुंबीयांनी लेखी तक्रारनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.