जयपूर, 06 जानेवारी : झारखंडमध्ये असलेल्या सम्मेद शिखर या ठिकाणाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात आलं, त्या विरोधात जैन संघटना एकत्र आल्या आहेत. त्याकरिता जयपूरमधल्या आणखी एका जैन मुनींनी प्राणत्याग केला आहे. गुरुवारी (5 जानेवारी) रात्री उशिरा जैन मुनी समर्थ सागर यांचं निधन झालं. गेल्या 4 दिवसांत प्राणत्याग केलेले हे दुसरे जैन मुनी आहेत. याबाबत माहिती मिळताच आज (शुक्रवार 6 जानेवारी) सकाळपासून जैन समुदायाच्या नागरिकांनी तिथल्या मंदिरात गर्दी केली. 'दैनिक भास्कर'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे.
केंद्र सरकारनं झारखंडमधल्या सम्मेद शिखर या जैनांच्या तीर्थक्षेत्राला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्यानंतर जैन समाजानं त्याला विरोध केलाय. त्या पार्श्वभूमीवर जयपूरच्या सांगानेरमधल्या संघीजी दिगंबर जैन मंदिरातले जैन मुनी सुज्ञेयसागर महाराज यांनी 3 जानेवारीला देहत्याग केला. त्यानंतर 3 दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या समर्थसागर या दुसऱ्या जैन मुनींनी गुरुवारी रात्री उशिरा प्राण सोडले. ही माहिती मिळताच आज (शुक्रवार) सकाळपासून जैन समाजाच्या नागरिकांनी मंदिरात गर्दी करायला सुरुवात केली.
हेही वाचा : जय बाबाजी! महाराज कीर्तनाला पोहोचावेत म्हणून पुणेकरांनी केली हेलिकॉप्टरची सोय, VIDEO VIRAL
मंदिरापासून विद्याधर नगरपर्यंत संत समर्थसागर यांची डोल यात्रा काढण्यात आली. जोपर्यंत झारखंड सरकार सम्मेद शिखरला तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करत नाही, तोपर्यंत जैन मुनी असेच बलिदान देत राहतील, असं जैन संत शशांक सागर यांनी सांगितलं. जैन मुनी समर्थ सागर यांनी सम्मेद शिखर वाचवण्याकरता प्राणांचं बलिदान केलंय. ते कायम स्मरणात राहील, असं सांगानेरच्या दिगंबर जैन मंदिराचे मंत्री सुरेश कुमार जैन यांनी म्हटलंय.
जैन मुनी समर्थ सागर महाराज आचार्य सुनील सागर महाराज यांचे शिष्य होते. गेल्या 3 दिवसांपासून ते उपोषण करत होते. केंद्र सरकारनं गुरुवारी (5 जानेवारी) या संदर्भात 3 वर्षांपूर्वी जाहीर केलेला आदेश मागे घेतला; मात्र झारखंड सरकार याबाबत जोवर निर्णय घेत नाही, तोपर्यंत जैन समाजाकडून हा विरोध सुरूच राहील, असं जैन समाजाचं म्हणणं आहे.
हेही वाचा : हेही वाचा : विराट-अनुष्काने वृंदावनात घेतला स्वामींचा आशीर्वाद, मुलगी वामिकाचा VIDEO VIRAL
जयपूरमध्ये अजूनही हा विरोध सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण जैन समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात श्वेतांबर आणि दिगंबर जैन समाजाचे नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. समर्थ सागर यांच्याकडे गुरुवारी भाजपचे काही पदाधिकारी आले होते; मात्र जोवर सम्मेद शिखरबाबतची खरी परिस्थिती झारखंड सरकार सांगत नाही, तोवर उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, असं आचार्य सुनील सागर यांनी सांगितलंय. तेव्हापासून ते पाणीही प्यायले नाहीत. देशबांधवांसाठी त्यांनी त्यांच्या प्राणाचा त्याग केला, असंही आचार्य सुनील सागर म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जैन समाजाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी आचार्य शशांक सागर महाराज यांनी केलीय. जैन समाजासाठी बोर्डची स्थापना केली पाहिजे, त्यामुळे समाजाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचतील, असं त्यांनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand