पाटणा, 11 जुलै : पती- पत्नीचं भांडण काही नवीन नाही. अनेक वेळेला हे वाद सार्वजनिक देखील होतात. पण, त्यामुळे संपूर्ण परिसरातील लाईट गेल्याची घटना बिहारमधील समस्तीपुरातील उजियापूर येथे घडली आहे. कारण, या महिलेनं लाईटच्या टॉवरवर चढून आपला राग व्यक्त केला. त्यामुळे परिसरातील विजेचा पुरवठा बंद करण्यात आला होता.
काय आहे नेमका प्रकार?
समस्तीपूरमधील जिल्ह्यात उजियापूरमधील चांदचौर गावातील हा सारा प्रकार आहे. पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर महिला चक्क विजेच्या टॉवरवर चढली. त्यामुळे गावात गोंधळाचं वातावरण झालं. लोकांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीही फायदा झाला नाही. महिला ज्या टॉवरवर चढली होती त्या टॉवरमधून 1 लाख 32 हजार वोल्ट विजेचा पुरवठा केला जात होता. हा सारा प्रकार तीन तासांपेक्षा देखील जास्त काळ सुरू होता. या साऱ्या प्रकाराची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आली. शिवाय, वीज पुरवठा विभागाला देखील याबद्दल सतर्क करण्यात आलं होतं.
महिलेची मानसिक स्थिती चांगली नसून पतीशी झालेल्या भांडणानंतर ती टॉवरवर चढल्याची माहिती यावेळी गावकऱ्यांनी दिली. ज्यावेळी महिला टॉवरवरून खाली उतरली तेव्हा गावकऱ्यांसह प्रशासनानं देखील सुटकेचा नि:श्वास सोडला.
राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? अशोक चव्हाण म्हणतात...