नवी मुंबई, 07 एप्रिल : एअर स्ट्राईकबद्दल सॅम पित्रोदा यांनी केलेल्या विधानावरून झालेला वाद शांत होत नाही तोच पित्रोदांवर पुन्हा एकदा टीका केली जात आहे. एअर स्ट्राईकबद्दलच्या विधानावरून सध्या त्यांना लक्ष्य केलं जात आहे. दरम्यान, हा वाद अद्याप देखील शमलेला नाही. तोच त्यांनी भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यावेळी त्यांनी भारतीयांच्या मोबाईल वापराबद्दल बोलताना 'माकडांच्या हातात खेळणं' असं विधान केल्यानं त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे. सोशल मीडियावर देखील त्यांच्या या विधानावरून टीका केली जात आहे. भाजपनं देखील सॅम पित्रोदा यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. 'भारत संपर्क साधण्याच्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करत नाही. आजच्या दुनियेतलं हे नवीन तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आता प्रत्येक माकडाच्या हातात एक नवीन खेळणं मिळालं' असल्याचं विधान पित्रोदा यांनी केलं आहे. त्यावरून आता त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
एअर स्ट्राईकबद्दल काय बोललं होते सॅम पित्रोदा
'मला हल्ल्यांबाबत जास्त काही माहीत नाही. पण, हल्ले होत राहतात. मुंबईवर देखील हल्ला झाला होता. त्यावेळी देखील एअर स्ट्राईक करता आला असता. पण, ते चुकीचं होतं. माझ्या मताप्रमाणे जगात वागण्याची ही पद्धत बरोबर नाही.'
'काही लोक येतात आणि हल्ला करतात. त्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार कसं ठरवणार?' असा सवाल यावेळी सॅम पित्रोदा यांनी केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. तसेच त्यांनी 'एअर स्ट्राईकमध्ये 300 दहशतवादी ठार झाले म्हणता. त्याला पुरावा काय?' असा सवाल केला होता.
'मी न्यू यॉर्क टाईम्स आणि इतर काही पेपर वाचले आहेत. त्यामुळ खरंच हल्ला करण्यात आला होता का? असा सवाल देखील निर्माण होतो.' असं देखील पित्रोदा यांनी म्हटलं होतं. 'मी सवाल केले म्हणून मला देशविरोधी ठरवता येत नाही. शिवाय, मी या बाजूचा की त्या बाजूचा हे देखील ठरवता येत नाही' असं देखील यावेळी पित्रोदा यांनी म्हटलं होतं.
'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'