मुंबई 22 जानेवारी : बॉलीवूडचे अनेक दिग्गज लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याची चर्चा आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोनही मोठे पक्ष बॉलिवूड स्टार्सला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करताहेत. बॉलिवूड स्टार्सच्या या यादीत आता आणखी एक नाव पुढे आलंय. सुपरस्टार सलमान खान हा मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
इंदूरलाच सलमान खानचा जन्म झाला होता. त्यामुळे इंदूर आणि सलमानचं खास नातं आहे. इंदूरलाच मध्य प्रदेशाचं मिनी मुंबई असंही म्हटलं जातं. त्यामुळे काँग्रेस सलमानचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे सचिव राकेश यादव यांनी याबाबतची माहिती दिलीय. सलमानच्या नावावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू असल्याची माहितीही यादव यांनी दिली.
सलमान खान आणि त्याचे वडिल सलिम खान यांची भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत जवळीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधालाही सलिम खान उपस्थित होते. त्यामुळे तो काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढणार का असाही प्रश्न विचारला जातोय.
करिनाच्याही नावाची चर्चा
लोकसभेच्या निवडणुकांना आता फक्त चार महिने राहिले आहेत. सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले असून उमेदवारांची निवडही सुरू झालीय. राजकीय उमेदवारांबरोबरच बॉलीवूडच्या दिग्गज कलाकारांनाही आपापल्या पक्षाकडून उमदवारी देण्यासाठी भाजप आणि काँग्रेस तयारीला लागले आहेत.
भोपाळमधून अभिनेत्री करिना कपूरला तिकिट देण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केलीय. तर पुण्यातून भाजपतर्फे माधुरी दीक्षितला उमेदवारी मिळू शकते अशीही चर्चा आहे. भाजपने माधुरीला तिकीट दिलंच तर तयारी असावी म्हणून काँग्रेसने करिनाला उमेदवारी देण्यासाठी चाचपणी केल्याचंही बोललं जातंय.
माधुरीला मिळणार पुण्याचं तिकिट?
देशभरातल्या मान्यवरांच्या संपर्क अभिनयांतर्गत काही महिन्यांपूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबई माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती आणि त्यांना काही पुस्तकं आणि सरकारच्या कामकाजाची माहिती देणारी पुस्तिकाही भेट दिली होती.
त्यानंतर भाजप माधुरीला तिकिट देणार अशी चर्चा सुरू झाली. पण माधुरीने अद्याप यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
2019 च्या निवडणुकीसाठी भाजपने बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातल्या काही दिग्गज कलाकारांची यादी तयार केलीय. त्याच्यातल्या काही लोकांना उमेदवारी मिळू शकते. त्यात माधुरी दीक्षित, गौतम गंभीर, सनी देओल, अजय देवगण, कपील देव, अक्षय कुमार, अनुपम खेर यांचा समावेश आहे. सध्या भाजपच्या वतीने हेमा मालीनी, परेश रावल, किरण खेर, मनोज तिवारी, बाबुल सुप्रीयो हे लोकसभेत खासदार म्हणून आहेत.
न्यूज18 लोकमत Exclusive : नारायण राणेंची अनकट मुलाखत