Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये पोलीस आल्याने व्यापाऱ्याची तारांबळ, घाईघाईने कुलूप लावत 2 महिलांना ठेवलं कोंडून

लॉकडाऊनमध्ये पोलीस आल्याने व्यापाऱ्याची तारांबळ, घाईघाईने कुलूप लावत 2 महिलांना ठेवलं कोंडून

मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून साडी सेंटरच्या मालकाने दुकान उघडले. पोलीस आल्यावर मात्र त्याने घाईघाईने कुलूप लावून तेथून काढता पाय घेतला. मात्र, त्याच्या दुकानात 2 ग्राहक महिला (आई-मुलगी) अडकून पडल्याचा त्याला पत्ताही नव्हता.

    धौलपूर, 27 एप्रिल: कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशातील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र अनेक शहरात नागरिकांनी हा लॉकडाऊन अजिबात गांभीर्याने घेतलेला दिसत नाही आहे. राजस्थानमधून देखील अशीच एक बातमी समोर येत आहे. धौलपूर जिल्ह्यातील सेंपऊ शहरातील काही व्यापारी अजूनही लॉकडाऊनचे (Rajasthan Lockdown) गांभीर्याने पालन करत नसल्याचे समोर आले आहे. येथील अनेक व्यापारी गुपचूप आपली दुकाने उघडून मालाची विक्री करत आहेत. कोरोनाचा संसर्ग (Corona in Rajasthan) वाढत असल्याच्या गंभीर स्थितीतही सर्व नियम धाब्यावर बसवून अशा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही घटना सोमवारी शहरातील मुख्य बाजारपेठेत उघडकीस आली. मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून सहेली साडी सेंटरच्या मालकाने दुकान उघडले. पोलीस आल्यावर मात्र त्याने घाईघाईने कुलूप लावून तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर तो त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाला बाडी येथे गेला. मात्र, त्याच्या दुकानात 2 ग्राहक महिला (आई-मुलगी) अडकून पडल्याचा त्याला पत्ताही नव्हता. 3 तासांच्या प्रतीक्षेनंतरही दुकानाचे शटर न उघडल्याने दुकानात या दोघींचा श्वास गुदमरू लागला. त्यामुळे इतर कोणताच पर्याय दिसत नसल्याने या दोघींना जोरजोरात शटर ठोठावत आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक केसरसिंग शेखावत नेमके घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शटरचे कुलूप तोडून आई-मुलीला बाहेर काढले. तसेच, दुकानदाराविरोधात एफआयआरचे आदेश देऊन दुकान सील केले. या प्रकाराने बाजारातील लोक झाले चकित बंद दुकानातून दोन महिलांचा आरडाओरडा ऐकून बाजारातील लोक चकित झाले. दुकानाच्या शटरला कुलूप होते. आतून सतत किंचाळण्याचा आवाज येत होता. दुकानाजवळ गर्दी जमली. परिसर पाहणीसाठी येथे आलेले पोलीस अधीक्षक केसरसिंह शेखावत गर्दी पाहून तेथे थांबले. लोकांनी त्यांना सांगितले की, आतून महिलांचा ओरडण्याचा आवाज येत आहे. त्यांनी दुकानावर लिहिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला आणि आतमध्ये दोन महिला बंद असल्याची माहिती दिली. हे वाचा - स्टेशनबाहेर विकायचे संत्री, कोरोनाच्या संकटात 400 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवले आणि झाले ‘प्यारे’ खान दुकानदार बनवारीने पोलीस अधीक्षक केसरसिंग शेखावत यांना सांगितले की, ते एका विवाह समारंभात आहेत. घटनास्थळी येण्यास वेळ लागेल. यानंतर पोलीस अधीक्षक शेखावत यांनी जराही उशीर न करता पोलीस कर्मचाऱ्यांना दुकानाच्या शटरला लावलेले कुलूप तोडण्यास सांगितले. पोलिसांनी दुकानाचे शटर उचलताच समोरून घामाने भिजलेल्या मायलेकी बाहेर आल्या. त्या दोघीही घाबरलेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना आपण राकेश कुशवाह यांची पत्नी मंजू आणि मुलगी वैष्णा कुशवाह असल्याची ओळख सांगितली. पोलीस अधीक्षकांनी या दोघींना धीर दिला. तोपर्यंत आई आणि मुलीनेही दुकानातून बाहेर पडल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. हे वाचा - स्टेशनबाहेर विकायचे संत्री, कोरोनाच्या संकटात 400 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवले आणि झाले ‘प्यारे’ खान दुकान सील करण्याच्या सूचना याबाबत पोलीस अधीक्षक केसरसिंग शेखावत यांनी उपविभागीय अधिकारी रामकिशोर मीणा यांना या दुकानदाराविरोधात राजस्थान महामारी अध्यादेश कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच दुकान सील करून दंड वसूल करण्यास सांगितले. तहसीलदार आसाराम गुर्जर यांनी तातडीने दुकान सील केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक विजयकुमार सिंह, सहायक उपनिरीक्षक उदय भानसिंग गुर्जर आदी उपस्थित होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Rajasthan

    पुढील बातम्या