भूज, 14 फेब्रुवारी: मुलगी वयात आल्यानंतर तिला मासिकपाळी येणं ही नैसर्गिक गोष्ट असतानाही आपल्याकडे अनेक ठिकाणी आजही या मासिक पाळीबाबत अनेक गोष्टी पाळण्याची प्रथा आहे. या प्रथा आणि नियमांपुढे बऱ्याचवेळी माणुसकीचाही विसर पडतो किंवा नियम पाळताना भान विसरतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींनी मासिक पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांना वॉशरूममध्ये नेऊन अंडरगारमेंट्स उतरवायला सांगण्यात आली. 68 विद्यार्थिनींना या लज्जास्पद प्रकाराला सामोरं जावं लागलं. विद्यार्थिनींनी होस्टेलचे नियम मोडल्याचा दावा करत त्यांची उलट तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली असून गुजरातच्या या इन्स्टिट्यूटची चौकशी होईल.
कच्छ इथल्या भूजमध्ये सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. संस्थेच्या प्राचार्यांनी हे प्रकरण वसतीगृहात घडलं. त्याचा संस्थेशी किंवा युनिव्हर्सिटीशी संबंध नाही असं सांगत हात झटकायचा प्रयत्न केला.
नेमका काय आहे प्रकार?
भूज सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूटच्या वसतिगृहामध्ये मुलींच्या मासिकपाळीसंदर्भात काही कठोर नियम पाळले जातात. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थिनींना इथे शिक्षा केली जाते. मासिक पाळी असणाऱ्या विद्यार्थिनींना इथे वेगळ बसवण्यात येतं. त्यांनी मासिकपाळी दरम्यान कुणालाही शिवायचं नाही. वेगळं राहायचं, आपलं सगळं काम अलिप्तासारखं वेगळं राहून करायचं. मात्र ह्या मुली नियम मोडत असल्याचा आरोप वसतिगृहाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी केला. या आरोपानंतर मुलींना खरंच मासिक पाळी आहे की नाही हे तपासण्यासाठी बाथरुममध्ये नेऊन कपडे उतरवण्यास सांगण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. आम्ही नियमांचं पालन करूनही अशाप्रकारचं गैरवर्तन झाल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा-धक्कादायक! कपडे बदलताना तरुणींचे काढायचा VIDEO, मुंबईत लेडीज टेलरला अटक
गुजरातमधील कच्छ इथे भुज सहदानंद गर्ल इन्स्टीट्यूट ही स्वामीनारायण संप्रदायाची आहे. इथे मुलींना मासिक पाळीदरम्यान वेगळं बसण्याचा नियम आहे. दरम्यान मुलींना या संदर्भात तपासणी कऱण्यासाठी बाथरुममध्ये नेण्यात आले तेव्हा तिथल्या विद्यार्थिनींनी या घटनेचा कडाडून विरोध केला. सर्व नियम पाळूनही अशा प्रकारे तपासणी करणं गैर असल्याचा आरोप संस्थाचालकांवर लावण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी केलेल्या विरोधामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो किंवा त्यांना वसतिगृहातून काढलं जाण्याची भीतीही या विद्यार्थिंनी व्यक्त केली आहे. हे संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी संस्थेनं बचावात्मक भूमिका घेतली आहे. तर आम्ही नियम पाळत असूनही आमच्यावर आरोपी करण्यात आले आणि आम्ही गैर पद्धतीनं तपासणीही करण्यात आल्याचं विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन संस्थाचालकांनी विद्यार्थिनींना दिलं आहे.
महिला आयोगाने घेतली दखल
राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली असून स्वतःहूनच तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आयोगाची चौकशी समिती या इन्स्टिट्यूटमध्ये चौकशी करेल.
National Commission for Women: We have taken suo-moto cognisance in the matter and have set-up an inquiry team to visit and speak with the students at Shree Sahjanand Girls Institute in Bhuj, Gujarat. pic.twitter.com/jetDWmXGAj
— ANI (@ANI) February 14, 2020
हेही वाचा-पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर, 25 वर्षीय तरुणीवर नवऱ्याच्याच संमतीने बलात्कार