Home /News /national /

मोठी बातमी : हायपरलूपमधून पहिल्या प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, पुढच्या फेरीत पुणेकर करणार प्रवास

मोठी बातमी : हायपरलूपमधून पहिल्या प्रवाशांचा सुरक्षित प्रवास, पुढच्या फेरीत पुणेकर करणार प्रवास

हायपरलूप पॉडमधून पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केल्यामुळे व्हर्जिनहायपरलूपने तिहास रचला.

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अमेरिकेतील डेवलूप टेस्ट फॅसिलिटी येथे हायपरलूप पॉडमधून पहिल्या मानवी तुकडीने यशस्वी प्रवास केल्यामुळे व्हर्जिनहायपरलूपने तिहास रचला. “गेली काही वर्षे व्हर्जिन हायपरलूपचा चमू आपले एकमेवाद्वितीय तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे,” असे व्हर्जिन समूहाचे संस्थापक सर रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले. “कल्पकतेचा मंत्रच येणाऱ्या काही वर्षांमध्ये सगळीकडच्या लोकांचे राहणीमान, काम आणि प्रवासाचे स्वरुप बदलणार असल्याचे आजच्या यशस्वी चाचणीद्वारे आम्ही दाखवून दिले आहे.” सहसंस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगेल आणि प्रवासी अनुभवविषयक संचालक सारा लुचिअन हे प्रवासाच्या या नव्या साधनातून प्रवास करणारे जगातील पहिले प्रवासी ठरले. पुढल्या फेरीत आता व्हर्जिन हायपरलूपचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ आणि पुण्याचे रहिवासी तनय मांजरेकर हे प्रवास करणार आहेत. “हायपरलूपवर काम करणे आणि यातून प्रथम प्रवास करणाऱ्यांपैकी एक असणे हे माझ्यासाठी स्वप्नच प्रत्यक्षात आल्यासारखे आहे,” असे व्हर्जिन हायपरलूपमधील पॉवर इलेक्ट्रॉनिर्स तज्ज्ञ तनय मांजरेकर म्हणाले. “भारत हे आव्हान स्वीकारून जगाच्या अनेक मैल पुढे जाण्याची आपल्यासमोर असलेली ही संधी ओळखेल आणि पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाबाबतची प्रगती सुरू ठेवेल, अशी मला आशा आहे.” सुरुवातीच्या टप्प्यापासून आजच्या मानवी चाचणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया इंडस्ट्रीमान्य इंडिपेंडंट सेफ्टी असेसर (आयएसए) सर्टिफायर यांच्या देखरेखीखाली पार पडली. नवीन अनावरण करण्यात आलेले हे एक्सपी 2 वाहन अत्यंत काटेकोर आणि व्यापक अशा सुरक्षितताविषयक प्रक्रियेतून तयार झाले असून व्यावसायिक हायपरलूप यंत्रणेमध्ये सुरक्षिततेविषयक काय खबरदारी घेतली जाईल, याचे दर्शन या वाहनातून घडते. अद्ययावत नियंत्रण यंत्रणेने हे वाहन युक्त असून असाधारण परिस्थिती निर्माण होत असल्यास तातडीने त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार सुयोग्य अशी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा लगेचच कार्यान्वित होते. “हायपरलूप सुरक्षित आहे का, असे मला कितीदा विचारले जाते याची गणतीच नाही,” असे व्हर्जिन हायपरलूपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे वॅल्डर म्हणाले. “आजच्या यशस्वी प्रवासी चाचणीने आम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. प्रवाशाला निर्वात पोकळीत सुरक्षितरित्या पॉडमध्ये बसवण्याच्या व्हर्जिन हायपरलूपच्या क्षमतेबरोबरच सुरक्षिततेबाबत कंपनी किती विचारपूर्वक पावले उचलत आहे, ज्यावर स्वतंत्र तिसऱ्या पक्षानेही शिक्कामोर्तब केले आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे.” प्रवाशांनी नव्याने अनावरण केलेल्या एक्सपी 2 या वाहनातून आपला हा पहिला प्रवास केला. बियाका इंगल्स समूहाच्या आरेखनातून हे वाहन साकारले असून प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधा यांचा विचार करून या वाहनाची रचना करण्यात आली आहे. व्यावसायिक स्वरुपात बनवण्यात येणारे वाहन आकाराने मोठे आणि 28 आसन क्षमतेचे असणार आहे; तर चाचणीसाठी वापरण्यात आलेले वाहन 2 प्रवासी क्षमतेचे होते. हायपरलूप वाहनातून प्रवासी सुरक्षितरित्या प्रवास करू शकतात, हे दाखवून देणे हा याचा हेतू होता. जगभरात या संदर्भात नियामक यंत्रणेच्या बाबत प्रगती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही घोषणा महत्त्वाची आहे. भारतात महाराष्ट्र सरकारने हायपरलूप प्रकल्प हा सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित केला असून मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पासाठी व्हर्जिन हायपरलूप-डीपी वर्ल्ड कन्सोर्शिअम यांना ओरिजिनल प्रोजेक्ट प्रपोनंट (ओपीपी) म्हणून मान्यता दिली आहे. पुणे-मुंबई हायपरलूप वाहतूक व्यवस्थेच्या उभारणीसाठी ही लक्षणीय घोषणा असून सार्वजनिक वाहतुकीच्या अन्य पारंपरिक साधनांच्या बरोबरीने हायपरलूप तंत्रज्ञानालाही मान्यता देण्यात आली आहे. अमेरिकन सरकारच्या वाहतूक मंत्रालयातील अपारंपरिक व उदयोन्मुख वाहतूक तंत्रज्ञान परिषदेने (एनईईटी) नियामक मार्गदर्शक दस्तावेज जारी केल्यानंतर व्हर्जिन हायपरलूप आता भारतात हायपरलूपसाठी नियामक चौकट तयार करण्यासंदर्भात भारताच्या केंद्रीय अधिकाऱ्यांसमवेत काम करण्यास उत्सुक आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Pune

पुढील बातम्या