कानपूर, 18 एप्रिल : रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत उत्तर प्रदेशात सामाजिक वातावरण तणावपूर्ण आहे. अजानचा वाद आणि हनुमान जयंती मिरवणुकीतील हाणामारीमुळे राज्यातील जातीय सलोखा दुखावला गेला आहे. अशात राम महोत्सव नावाच्या एका कार्यक्रमात साध्वी ऋतंभरा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी हिंदूंना दोन नव्हे तर चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलं आहे.
उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेतर्फे रामोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी साध्वी ऋतंभरा आल्या होत्या. कार्यक्रमाला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक हिंदूने दोन मुलांच्या विचारातून बाहेर आले पाहिजे. प्रत्येक हिंदूने आता चार मुलं जन्माला घातली पाहिजेत. यातील दोन मुले कुटुंबासाठी आणि उरलेली दोन मुले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) यांच्याकडे सोपवली जावी जेणेकरून ते राष्ट्रीय बलिदानात योगदान देऊ शकतील.
यासोबतच साध्वी म्हणाल्या, 'रामोत्सवात हजारो श्रीराम रूपांची पूजा करण्यात आली. या सुंदर प्रसंगी रामाचे भक्त होणे ही भाग्याची गोष्ट आहे. रामभक्त होण्यासाठी रामत्व आत्मसात करावे लागते, कारण राम हे अपराजित पौरुषाचे प्रतीक आहे. कार्यक्रमात रामाच्या वेशभूषेत अनेक मुले सहभागी झाली होती. साध्वी म्हणाल्या की, देशातील राजकीय पक्षांनी हिंदूंमध्ये फूट पाडली. पण, श्रीरामाचे आचरण संपूर्ण समाजाला एकत्र आणेल. साध्वीच्या आधी गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनीही हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. हिमाचलमधील एका कार्यक्रमात बोलताना जामिनावर बाहेर असलेले नरसिंहानंद म्हणाले की, भारताला इस्लामिक देश होण्यापासून रोखायचे असेल तर हिंदूंनी अधिकाधिक मुले जन्माला घातली पाहिजे.
त्याचवेळी या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस मिलिंद परांडे यांनी कथित लव्ह जिहादच्या प्रकरणांचा संदर्भ देताना सांगितले की, 'एकेकाळी सीता मातेच्या अपहरणामुळे रावणाचा संपूर्ण नाश झाला होता आणि आज लव्ह जिहाद करणार्यांचा समूळ नायनाट करायचा आहे, ठेचून काढायचे आहे, फक्त रामाची पूजा करून काही होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.