भोपाळ, 23 एप्रिल : भोपाळमधून भाजपने साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली आहे पण साध्वींच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे. साध्वी प्रज्ञासिंह या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणात तब्येतीच्या कारणांमुळे त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही साध्वींनी मुंबई हल्ल्यातले शहीद हेमंत करकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून नवा वाद ओढवून घेतला. यावर टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांचं विधान मागे घेतलं खरं पण त्यानंतरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याचं सत्र सुरूच ठेवलं आहे.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
साध्वींच्या उमेदवारीविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून आयोगाने साध्वींना नोटिसा पाठवल्या आहेत. हे सगळं पाहता भोपाळमधून भाजपने आणखी एका उमेदवाराचा अर्ज भरून घेतला आहे. इथून दिग्विजयसिंह यांच्याविरोधात आलोक संजर यांनी भाजपतर्फेच निवडणूक अर्ज भरला आहे.
आलोक संजर यांचा अर्ज
पक्षनेतृत्वाच्या आदेशावरून आपण भोपाळमधून उमेदवारी अर्ज भरला, असं आलोक संजर यांनी न्यूज 18 ला सांगितलं. साध्वींची उमेदवारी रद्द होण्याची वेळ आली तर भाजपने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे, हेच यावरून दिसतं.
माझा पक्ष मला जो आदेश देतो त्याचं मी पालन करतो, असं आलोक संजर म्हणाले. पण साध्वी प्रज्ञासिंह यांची उमेदवारी रद्द होईल, अशी शक्यता दिसत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
मी भोपाळच्या जनतेसाठी चांगलं काम केलं आहे. माझ्यावर जबाबदारी दिली नाही तरीही मी इथल्या लोकांचं ऋण फेडेन, असंही आलोक संजर म्हणाले. माझ्यामुळे कोणी दु:खी होऊ नये, असं मला वाटतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
'गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो'
साध्वी प्रज्ञासिंह या काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना, गोमूत्रामुळे कॅन्सर बरा होतो, असं विधान त्यांनी केलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.
गायीच्या पाठीवरून हात फिरवला की हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब बरा होतो, असंही विधान साध्वी यांनी केलं आहे.
==================================================================
VIDEO : मनसेसैनिकांचा नवा लूक, 'लाव रे तो व्हिडिओ'