'प्रकृती बरी नाही म्हणून जामीन मिळवला मग निवडणूक कशी लढवतात?' मालेगाव स्फोट पीडिताचा सवाल

मालेगाव बाँबस्फोटात बळी गेलेल्याच्या वडिलांनी याचिका दाखल केली. तसंच साध्वी प्रज्ञा या दहशतवादाच्या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी तक्रार तेहसीन पुनावाला यांनीही दाखल केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 09:29 PM IST

'प्रकृती बरी नाही म्हणून जामीन मिळवला मग निवडणूक कशी लढवतात?' मालेगाव स्फोट पीडिताचा सवाल

भोपाळ, 18 एप्रिल : साध्वी प्रज्ञा या दहशतवादाच्या गुन्ह्यात आरोपी आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी तक्रार तेहसीन पुनावाला यांनी दाखल केली आहे. मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी जाहीर केली. यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीसुद्धा त्यांच्या उमेदवारीविषयी आक्षेप नोंदवला होता.Loading...


मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात बळी गेलेल्याच्या वडिलांनीही NIA कोर्टात साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविरोधात याचिका दाखल केली आहे.  साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना लोकसभेची निवडणूक लढवण्यास बंदी घाला, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.
सय्यद बिलाल यांनी याचिका दाखल करताना म्हटलं आहे की, साध्वी प्रज्ञा आरोपी आहेत. त्यांची तब्येत बरी नाही, म्हणून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक लढवण्याएवढी त्यांची तब्येत ठीक आहे तर मग त्या मुंबईत सुनावणीसाठी येऊ शकत नाहीत का, त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात यावं आणि निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी, असं या याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान गुरुवारी पत्रकारांशी या सगळ्याविषयी बोलताना साध्वी प्रज्ञा भावुक झाल्या. म्हणाल्या, "मला काहीही न सांगता ताब्यात घेतलं. काहीही ऐकून न घेता तू बाँबस्फोट केलेस, तू दहशतवादी आहेस, संघ दहशतवादी आहे असं माझ्याकडून वदवून घ्यायचा प्रयत्न झाला", असं सांगत तुरुंगात आपल्यावर कसा दबाव टाकण्यात आला याचं वर्णन केलं.

"मी जे केलंच नाही, त्याची कबुली कशी देणार? 24 दिवस मी काहीही न खाता फक्त पाणी पिऊन राहिले, झोपलेही नाही. पण गप्प राहिले. त्यांच्या दबावाला बळी पडले नाही. ते जे देशविरोधात षडयंत्र करत होते, त्यात अडकले नाही" , असं साध्वी प्रज्ञा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

ओमर अब्दुल्ला यांचा सवाल

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून सुटका झालेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांना त्या टक्कर देत आहेत.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीवरून विरोधक टीका करत आहेत. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही साध्वींच्या उमेदवारीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनावर सुटका मग निवडणूक कशी लढवतात?

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांची जामिनावर सुटका झाली. त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना जामीन मिळाला. मग त्या निवडणूक कशी काय लढू शकतात, असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

दहशतवादी कारवायांच्या खटल्यात जी व्यक्ती आरोपी असून जामिनावर बाहेर आहे अशा व्यक्तीला भाजप उमेदवारी कसं काय देऊ शकतं, असा सवाल त्यांनी विचारला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे साध्वींना जामीन दिला गेला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्या तुरुंगात राहू शकत नाहीत, मग निवडणूक कशी काय लढवू शकतात, असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले.

साध्वी प्रज्ञासिंह यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा, असी मला अपेक्षा आहे, अशी टिप्पणीही ओमर अब्दुल्ला यांनी केली. ओमर यांनी श्रीनगरमध्ये गुरुवारी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका केली.

भोपाळमधून भाजप शिवराज सिंह किंवा उमा भारती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार होतं. पण या दोघांनीही नकार दिल्याने प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली.

साध्वी यांच्या अचानक एन्ट्रीमुळे भाजपचे अनेक दिग्गज नेते निराश झाले आहेत. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सहमतीनेच हा निर्णय झाला आहे, असं स्थानिक नेत्यांना सांगण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 06:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...