आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाची सारवासारव, प्रसिद्ध केलं 'हे' निवेदन

आरक्षणाच्या मुद्द्यावर संघाची सारवासारव, प्रसिद्ध केलं 'हे' निवेदन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख - सरसंघचालक - मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत भाष्य करत एका नव्या वादाला तोंड फोडलं हे लक्षात येताच RSS च्या वतीने घाईघाईने एक निवेदन सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख - सरसंघचालक - मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत भाष्य करत एका नव्या वादाला तोंड फोडलं हे लक्षात येताच RSS च्या वतीने घाईघाईने एक निवेदन सोशल मीडियावरून प्रसिद्ध केलं. संघ आरक्षणविरोधात नाही, हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी हे निवेदन दिल्याची चर्चा आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात एक विधान केलं, त्यावरून राजकीय गदारोळ उठला. रामदास आठवलेंपासून ते मायावतींपर्यंत अनेक बड्या नेत्यांनी त्यावर भाष्य केलं. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालकांनी हे वक्तव्य केल्याने त्याचे निवडणुकीत काय परिणाम होतील यावरही बातम्या आल्या. त्यानंतर संघाने संध्याकाळी तातडीने निवेदन प्रसिद्ध करून विनाकारण वाद वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका केली.

हे वाचा - राज ठाकरेंसाठी अजित पवार, धनंजय मुंडे फडणवीस सरकारवर कडाडले, पाहा हा VIDEO

संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी हे निवेदन केलं. 'अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना आरक्षण देण्याची संघाची भूमिका आहे', असं त्यात म्हटलं आहे. संघ आरक्षणाच्या विरोधात नाही. सरसंघचालकांनी केवळ आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर विचारविनिमय व्हावा, खुली चर्चा व्हावी असं आवाहन केलं होतं, अशी सारवासारव संघाला करावी लागली.

हे वाचा - विरोधकांची मागणी धुडकावली, पूरग्रस्त भागात सरसकट कर्जमाफी नाही

याआधी आरक्षणावर भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केले होते. मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर देशभरातील वातवरण ढवळून निघालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा मोहन भागवतांनी देशातील आरक्षणावर भाष्य केलं आहे.

दरम्यान मोहन भागवत यांनी रविवारी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात, ‘जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत आणि जे विरोधात आहेत, त्यांनी या प्रश्नावर एकत्रित चर्चा करायला हवी. मी आधीही आरक्षणाबद्दल बोललो होतो, पण तेव्हा मोठा गदारोळ झाला आणि खऱ्या मुद्द्यावरून चर्चा भरकटली. पण जे आरक्षणाच्या बाजूचे आहेत त्यांनी विरोध करणाऱ्यांच्या हिताकडे पाहिलं पाहिजे. तसंच जे विरोध करणारे आहेत त्यांनीही तसंच करावं,’ असं म्हटलं होतं.

मोहन भागवत यांनी आरक्षण प्रश्नावर नवी चर्चा छेडल्याने तीन राज्यांत काही महिन्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांतही या मुद्द्यावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. कारण मोहन भागवत यांनी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीआधीही आरक्षणाबाबत असंच काहीसं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर बिहारमध्ये वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

बिहार विधानसभा निवडणुकीत राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी मोहन भागवत यांच्या आरक्षणावरील वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. निवडणुकीत अनेक सभांमधून लालूप्रसाद यादव यांनी भागवत यांच्या आरक्षणावरील भूमिकेवरून भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. याचा परिणाम म्हणून बिहारमधील सर्व राजकीय गणितं बदलली आणि भाजपला तिथं मोठा पराभव सहन करावा लागला.

येत्या काही महिन्यांत महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीतही विरोधकांनी आरक्षण आणि मोहन भागवतांची भूमिका याबाबत रान उठवल्यास भाजपच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे आगामी काळात आरक्षणप्रश्नावरून राजकीय क्षेत्रात काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

VIDEO : ...तर हातमिळवणीला तयार, प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसला नवी ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या