भोपाळ, 17 जानेवारी : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमधील काही भागांमध्ये संचारबंदी (Curfew) लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. अर्थात यावेळी संचारबंदीचं कारण हे कोरोना व्हायरस (Coronavirus) नाही. तर कायदा आणि सुव्यवस्थेचं संरक्षण आहे.
काय आहे प्रकरण?
भोपाळमधील कबाडखाना परिसरातील 30 हजार चौरस फुट जमिनीवर भिंत उभारणीचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS ) करणार होते. त्यावेळी काही जणांनी आक्षेप घेत ती जमीन वक्फ बोर्डाची (Waqf Board) असल्याचा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात (High Court) गेलं. उच्च न्यायालयानं RSS च्या बाजूनं निर्णय दिला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर संघाचे पदाधिकारी या जमिनीचा ताबा घेणार आहेत भोपाळ शहरातील संघाचे मुख्यालय असलेल्या ‘केशव निगम’ (Keshav Nigam) या कार्यालयातील पदाधिकारी या जमिनीचा ताबा घेतील. त्यावेळी या जमिनीला कुंपण देखील घालण्यात येईल.
या जमीन अधिग्रहणाच्या कार्यक्रमात कोणत्याही गटानं अडथळा निर्माण करु नये, म्हणून रविवारी सकाळपासून सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
काय बंद, कशाला सूट?
भोपाळमधील हनुमान गंज, टीला जमालपूरा, गौतम नगर या भागात पूर्ण संचारबंदी असेल. त्याचबरोबर इतवारा, सोमवारा, बुधवारा, भारत टॉकीज चौक या भागातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असन लोकांच्या फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या भागातील सर्व व्यावसायिक संस्था, दुकानं आणि उद्योग बंद असतील. त्याचबरोबर रस्त्यांवर केवळ आवश्यक वाहनांनाच परवानगी आहे. हॉस्पिटल आणि मेडिकल दुकानांना या संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे.
स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना देखील या संचारबंदीमधून सूट देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांचं ओळखपत्र दाखवून या भागातून प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर परीक्षेतील ट्यूटीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सवलत देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.