देशभरात काँग्रेसचा प्रचार करणार : रॉबर्ट वाड्रा

देशभरात काँग्रेसचा प्रचार करणार : रॉबर्ट वाड्रा

रॉबर्ट वाड्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून राजकारणात येण्याचे संकेत याआधी दिले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांच्यानंतर रॉबर्ट वाड्राही काँग्रेसच्या प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना रॉबर्ट वाड्रा यांनी काँग्रेसचा प्रचार करणार का यावर हो असं उत्तर दिलं.

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी आज माध्यमांशी बोलताना येत्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचार करणार असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघात प्रचारासाठी जाणार का यावर वाड्रांनी सकारात्मक उत्तर दिलं.

रॉबर्ट वाड्रांनी सांगितले की, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करतील तेव्हा त्यांच्यासोबत मतदारसंघात जाणार आहे.

राहुल गांधी आणि प्रियांका यांच्यासोबत अनेकदा रॉबर्ट वाड्रा मतदारसंघात दिसतात. काही दिवसांपूर्वी रॉबर्ट वाड्रा यांनी सोशल मीडियावरून राजकारणात येण्याचे संकेतही दिले होते.प्रियांका गांधी - वाड्रा यांच्याकडे उत्तर प्रदेशातील सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली. प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रिय करण्यात आल्यानंतर काँग्रेस आणखी एक चाल खेळण्याच्या तयारीत आहे. सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी रॉबर्ड वाड्रा यांनी फेसबुकवरून त्याबाबतचे सुतोवाच केले होते.

रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे ईडीचा ससेमिरा

रॉबर्ट वाड्रा यांच्यामागे सध्या मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये ईडीचा सेसमिरा लागला आहे. आत्तापर्यंत रॉबर्ट वाड्रा यांची ईडीनं तीन वेळा कसून चौकशी केली आहे. यावेळी वाड्रा यांनी ही भाजपची राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना प्रियांका गांधी यांनी देखील मी कुटुंबाच्या मागे ठामपणे उभी असल्याचं म्हटलं होतं.

काय आहे मनी लाँड्रिंग प्रकरण?

मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील 'ब्रायनस्टन स्क्वेअर' येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 05:17 PM IST

ताज्या बातम्या