लखनौ, 23 जानेवारी : लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी काँग्रेसने मास्टर स्टोक मारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पक्षातील सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे. प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत पती रॉबर्ट वाड्रा यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे.
'अभिनंदन प्रियांका...मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्या बाजूने उभा असेल...तू तुझ्या परीने सर्वोत्तम प्रयत्न कर,' असं रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी अखेर आज पूर्ण झाली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे.गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रियांका सहभागी झाल्याचं चित्र दिसत होतं. राजस्थानमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाचा पेच तयार झाला तेव्हा त्यांनीच पुढाकार घेतला होता.
राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड स्पर्धा होती. तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी प्रियांका या भाऊ राहुल गांधी यांच्या मदतीला धावल्या होत्या.प्रियांका यांनी आतापर्यंत निवडणूक लढवलेली नसली तरीही त्या याआधीही अनेकदा राजकीय मंचावर दिसल्या आहेत.
राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ अमेठी आणि सोनिया गांधी जिथून निवडून येतात त्या रायबरेली या मतदारसंघात प्रियांका नियमितपणे अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत असतात.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका पक्षाची एंट्री, लोकसभेसाठी 14 उमेदवारांचीही घोषणा