ग्रेटर नोएडा, 15 डिसेबर: एक छोटीशी चूक तुम्हाला किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय नुकताच नोएडा (Noida) राहणाऱ्या एका महिलेला आला आहे. कॅब बुक (Cab Booking) करण्याच्या बहाण्याने या महिलेला तब्बल एक लाख रुपयांचा गंडा (Fraud) घातला आहे. ही महिला पेशाने डॉक्टर असून ग्रेटर नोएडातील (Greater Noida) गौर सिटी सोसायटीमध्ये राहते. तिनं कॅब बुक करण्यासाठी गुगलवर (Google) सर्च करून टोल फ्री क्रमांक (toll free number) मिळवून त्यावर फोन केला होता.
या महिलेचा असा आरोप आहे की, चोरट्यानं तिचा फोन नंबर इंटरनेटवरून मिळवला आणि तिला कॉल बॅक करुन ऑनलाइन पद्धतीनं कॅबचं भाडं भरायला सांगितलं. त्यासाठी आरोपीनं या महिलेला एक Application ही डाऊनलोड करायला सांगितलं. त्यानंतर आरोपीने या महिलेच्या बँक खात्यातून एक लाख रूपये गायब केले. यासंबंधी महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस याचा तपास करत आहेत.
तक्रारदार महिला ग्रेटर नोएडातील एका हॉस्पिटलमध्ये काम करते. ती नेहमी कॅबने ये-जा करते. यावेळी तिनं कॅब बुक करण्यासाठी गुगलवरून टोल फ्री क्रमांक मिळवला आणि त्यावर फोन करून कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या महिलेला मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीनं फोन करून कॅबचं भाडं भरण्यास सांगितलं. तसेच भाडं भरण्यासाठी तिच्या मोबाइलवर एक लिंकही पाठवली आणि या लिंकच्या माध्यमातून या सायबर चोरट्यानं या महिलेच्या बँक खात्यातून 1 लाख रूपये लांबवले आहेत.
हा संघटित सायबर क्राइमचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना आहे. अशा पद्धतीनं आणखी काही लोकांनाही फसवलं आहे का ? याचा तपास पोलीस करत आहे. तसंच लवकरात लवकर त्या महिलेला तिचे पैसे मिळवून देण्यासाठी पोलिसांनी तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे.