RIP Sushma Swaraj : सुष'माँ' स्वराज काळाच्या पडद्याआड, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

RIP Sushma Swaraj : सुष'माँ' स्वराज काळाच्या पडद्याआड, दुपारी 4 वाजता होणार अंत्यसंस्कार

RIP Sushma Swaraj : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj)  यांचं मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री हृदयविकारामुळे निधन झालं. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात रात्री दाखल करण्यात आलं, यादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासूनच सुषमा स्वराज आजारी होत्या. जवळपास दीड वर्षांपूर्वीच त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीच्या कारणांमुळेच त्यांनी लोकसभा निवडणूक 2019 न लढवण्याचा निर्णयदेखील जाहीर केला होता.

(वाचा : 'हे' होते सुषमा स्वराज यांचे अखेरचे शब्द)

भाजपच्या अभ्यासू आणि धडाडीच्या नेत्या

देशाच्या परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुषमा स्वराज या दुसऱ्या महिला होत्या. तसंच त्यांनी राजधानी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता. उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती. परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर त्या अतिशय सक्रिय होत्या. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अडचणीत सापडलेल्या जगभरातील भारतीयांना मदत केली. याचा शेकडो नागरिकांना फायदा झाला.

(पाहा : #SushmaSwaraj: सुषमा स्वराज यांचे दुर्मिळ PHOTOS, अशी मिळवली लोकांच्या मनात जागा)

सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांनाही धक्का बसला आहे. भाजपमधल्या कणखर महिला नेत्या गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त करत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर आज दुपारी  होणार अंत्यसंस्कार

सकाळी 11 वाजता : सुषमा स्वराज यांचं पार्थिव जंतर-मंतर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

दुपारी 12 वाजता : यानंतर स्वराज यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात ठेवलं जाईल. सर्वसामान्य जनतेला त्यांचं अंतिम दर्शन घेता यावं, यासाठी दुपारी 2.30 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव ठेवलं जाईल.

दुपारी 4 वाजता : लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

7 वेळा खासदार

सुषमा स्वराज सात वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. मोदी सरकारच्या 2014-2019 कार्यकाळादरम्यान त्यांनी परराष्ट्रमंत्री भूषवलं. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीयांसमोर जेव्हा-जेव्हा अडचणी उभ्या राहिल्या तेव्हा-तेव्हा स्वराज यांनी त्यांच्यापर्यंत तातडीनं मदत पोहोचवली आहे.

14 फेब्रुवारी 1952 रोजी सुषमा स्वराज यांचा हरियाणाच्या अम्बालामध्ये जन्म झाला होता. सक्रीय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टात त्या वकील म्हणून आपलं कर्तव्य बजावत होत्या.

दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा बहुमान

अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं होतं. वयाच्या 25 व्या वर्षी स्वराज यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 1998मध्ये त्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि यानंतर राजधानी दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता.

VIDEO: भाजपमधलं उमदं नेतृत्व हरपलं- माधव भांडारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 07:36 AM IST

ताज्या बातम्या