दिनेश केळुस्कर, पणजी 18 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर पंचतत्वात विलीन झाले. मात्र त्यांच्या जाण्यानंतर गोव्यात निर्माण झालेला मुख्यमंत्रीपदाचा पेच अजुन सुटलेला नाही. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हा पेच सुटावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदासाठीच्या नावावर एकमत झालेलं नाही.
भाजपला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने आता नवीन अट घातली आहे. तीनही आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा द्या अशी अट मगोपने घातली आहे. त्याचबरोबर नव्या मुख्यमंत्र्यांनी तसं लेखी आश्वासन द्यावी अशी मागणीही मगोपच्या नेत्यांनी केलीय. असं आश्वासन मिळालं तरच भाजपला पाठिंबा देऊ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत.
दिगंबर कामतांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळलं
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पण कामत यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याने गोवा सरकार बहुमतात आहे, हे सिद्ध करण्यासााठी दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यासाठी ते दिल्लीवरून गोव्याकडे निघाले आहेत, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. यावर माझा दिल्लीचा दौरा दोन दिवसांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे कोणालाही भेटण्याचा प्रश्नच येत नाही. मला भाजपकडून कोणतीही ऑफर नाही आणि मी मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नाही, असं कामत यांनी स्पष्ट केलं आहे.
गोव्यातील संख्याबळ
एकूण जागा : 40
सध्याचे संख्याबळ - 36
भाजप : 12
मगोप - 3
गोवा फॉरवर्ड - 3
अपक्ष - 3
काँग्रेस आघाडी
काँग्रेस : 14
राष्ट्रवादी काँग्रेस- 1
VIDEO: 'पर्रिकर संसदेत अचानक मराठी बोलायचे आणि...'