हैदराबाद 20 जानेवारी : कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकारला खाली खेचण्याचा भाजपचा डाव फसला आहे. 'ऑपरेशन लोटस' फसण्याची ही दुसरी वेळ आहे. काँग्रेसच्या काही असंतुष्ट आमदारांना हाताशी धरून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव होता. मात्र त्यात यश आलं नाही. कर्नाटकात भाजपला धक्का बसला असताना आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या चारपैकी दोन आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने अमित शहांना दुहेरी धक्का मानला जातो.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे पक्षात चाणक्य म्हणून ओळखले जातात. निवडणुकीचं मशिन म्हणूनही त्यांची ओळख दिली जाते. शहांच्याच चाणक्य नीतीनुसार कर्नाटकात भाजपच्या नेत्यांनी चाल खेळली मात्र ती चाल फारशी यशस्वी ठरली नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपले सर्व आमदार एकत्र ठेवले आणि भाजपला डाव उधळला.
तिकडे शेजारच्या आंध्र प्रदेशात भाजपलाच गळती लागली. आंध्रात भाजपचे फक्त चार आमदार आहेत. त्यातल्या एकाने राजीनामा दिल्याने खळबळ उडालीय. राजमहेन्द्रवरम् (शहर) विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले अकुला सत्यनारायण यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांना पाठवून दिला.
अभिनेता पवन कल्याण यांच्या जन सेना पार्टी या पक्षात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तर विशाखापट्टनम् (उत्तर ) चे आमदार पी विष्णु कुमार हेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे भाजपचे चाणक्य आता कुठली उपाययोजना करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.