नवी दिल्ली, 08 जानेवारी : भारतात (India) लवकरच कोरोना लसीकरण (Corona Vaccination) मोहीम सुरू होणार आहे. सर्वांना या लशीचे दोन डोस (Two Doses) घेणं आवश्यक आहे. या दोन डोसमध्ये काही दिवसांचं अंतर ठेवणं ही आवश्यक आहे. अमेरिकेत (USA) जिथं पहिल्यांदा कोव्हिड 19 ची लस देण्यास सुरुवात झाली आहे, तिथं या दोन डोसमध्ये काही आठवड्यांचं अंतर ठेवलं जात आहे. पण लशीच्या दोन डोसमध्ये इतकं अंतर ठेवणं का गरजेचं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लसीच्या दोन डोसांमध्ये इतकं अंतर ठेवणं का गरजेचं आहे, या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यापूर्वी दोन डोस का हे समजून घेणं आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी एक डोस पुरेसा नाही, असं संधोनातून दिसून आलं आहे. लशीच्या एका डोसमुळे प्रतिकार यंत्रणा कार्यक्षम होते पण ती अधिक प्रभावी होण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी दुसरा डोस आवश्यक आहे.
लशीचा पहिला डोस आपल्या शरीरातील प्रतिकार यंत्रणेला कोरोनाचा विषाणू (Corona Virus) कसा ओळखायचा आणि त्यापासून कसं वाचायचं हे शिकवतो. तर दुसरा डोस हा धडा अधिक पक्का करण्यास मदत करतो. या शिवाय लशीचा कोणावर दुष्परिणाम झाला आहे का किंवा दीर्घकाळ दुष्परिणाम टिकून राहिलेला नाही ना हे पाहून त्यानुसार दुसरा डोस देताना उपाययोजना करता येऊ शकते.
सर्वांना आधी एक डोस मग दुसरा असं शक्य नाही : कोरोना लसीच्या प्रभावानुसार प्राधान्य ठरवणे आवशयक आहे. भारतासारख्या मोठ्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करणं हे मोठं आव्हान आहे. अशावेळी सर्वांना एक डोस देऊन पूर्ण झाल्यावर दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करणं हे व्यावहारिक पातळीवर अशक्य आहे.
धक्कादायक! कोरोना लस घेतलेल्या आणखी एकाचा मृत्यू; ठणठणीत डॉक्टरचा गेला जीव
दोन डोसमध्ये अंतर का?
या लशीचे दोन डोस देणं योग्य आहे, पण त्यात किती अंतर असावं हे प्रत्येक लशीवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ फायझरच्या (Pfizer) लशीचा दुसरा डोस पहिला डोस दिल्यानंतर तीन आठवड्यांनंतर दिला जातो, तर मॉडर्ना आणि अॅस्ट्राझेनेकाच्या लशीचा दुसरा डोस चार आठवड्यांनंतर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. साधारणपणे दोन डोसामधील अंतर 21 ते 28 दिवस असणं आदर्श मानण्यात येत आहे. प्रत्येक लशीच्या बाबतीत हा कालावधी वेगवेगळा आहे.
दरम्यान या अंतरावरूनही बऱ्याच सूचना देण्यात आल्या. पहिल्यांदा सर्वांना एक डोस देण्यात यावा, सगळ्यांना पहिला डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की मग दुसरा डोस देण्यास सुरुवात करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. पहिल्या डोसचा परिणाम 12 आठवडे टिकतो, त्यामुळे लसीकरण प्रक्रियेचं नियोजन असं व्हावं की 12 आठवड्यांमध्ये सर्वांना एक डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी आणि मग दुसरा डोस द्यावा, असंही सुचवण्यात आलं आहे.
नव्या स्ट्रेनचा धसका! तिसऱ्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी
ब्रिटनसारख्या देशानं वरील पद्धतच अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण युरोप हीच पद्धत अवलंबण्याची शक्यता आहे. पण अमेरिका यासाठी तयार नाही. अमेरिकेची लोकसंख्या जास्त असून खरंच पहिला डोस 12 आठवडे प्रभावी राहू शकतो याचाही काही ठोस पुरावा नाही. या पार्श्वभूमीवर जोवर आपलं शरीर कोव्हिड 19 जारावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही, तोपर्यंत आपण सुरक्षिततेची काळजी घेणं आवश्यक आहे. यामुळे कोव्हिड 19 चा संसर्गही कमी होईल आणि लसीकरण लवकर पूर्ण करण्याचा दबावही कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine