शिल्पा गाड, 05 मे : कवीला अनेक वर्षांपुढचं दिसतं असं म्हटलं जातं. मराठीत बा. सी मर्ढेकरांची 'पिपात मेले ओल्या उंदिर' ही कविता आजची मराठी रसिक जनांच्या मनात आहे. पण ही कविता आता प्रत्यक्षात आली आहे, ती बिहारमध्ये. कारण बिहारमध्ये जप्त करण्यात आलेली 9 लाख 15 हजार लीटर दारु ही उंदीर प्यायले, असा अहवाल बिहार पोलीस प्रशासनानं सरकारला दिला आहे.
बिहारमध्ये एप्रिलपासून दारुबंदी लागू करण्यात आली आणि त्यानंतर बिहारमध्ये दारु जप्त करण्याचं एकच पेव फुटलं. दारुबंदी संदर्भात देशभरात उलटसुलट चर्चाही झाल्या. ठिकठिकाणी छापे घालून पोलिसांनी दारु जप्त करण्याची मोहिमच सुरु केली. गेल्या 13 महिन्यात तब्ब्ल 9 लाख 15 हजार लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. पण हळूहळू ही दारु कमी व्हायला लागलीय की काय अशी शंका राज्य सरकारला आली.
त्यापार्श्वभूमीवर चाळीस पोलीस जिल्ह्यातल्या एसपींकडून पोलिस ठाण्यांमध्ये असलेल्या दारुची माहिती बिहार सरकारनं मागवली. त्यापैकी ज्या काही पोलिस ठाण्यांनी,"सर्व दारु उंदरांनी रिचवल्याचा" अहवाल दिला आहे. या बेवड्या उंदीरांमुळे बिहारमध्ये सध्या एकच गोंधळ निर्माण झाला आहे.
अाता ज्या पोलिस ठाण्यांमधली दारु उंदरांनी रिचवलीय, तिथल्या पोलिसांची ब्रेथ अॅनालायझर चाचणी करण्याचं पोलिसांनी ठरवलं आहे. कारण काहीही असो बा. सी. मर्ढेकरांच्या शब्दात लिहिलेले उंदिर 2017 मध्ये बिहारमध्ये प्रत्यक्षात अवतरले हेही नसे थोडके...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा