बिहारच्या निकालाचा रामदास आठवलेंना आनंद, देवेंद्र फडणवीसांवरही केलं भाष्य

बिहारच्या निकालाचा रामदास आठवलेंना आनंद, देवेंद्र फडणवीसांवरही केलं भाष्य

बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : बिहारमध्ये तीन टप्प्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजप यांच्या ‘एनडीए’विरोधात राजदप्रणीत काँग्रेस, डाव्या पक्षांच्या महाआघाडीने दमदार आव्हान उभं केलं आहे. मतमोजणीनुसार, बिहारमध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. अशातच या निकालाबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने नितीश कुमार आणि एनडीएवर प्रचंड टीका केली. मात्र त्यांना बिहारच्या जनतेने नाकारले असून एनडीएला स्पष्ट बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपचे सुशीलकुमार, देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी मेहनत घेऊन प्रचार केला. बिहारच्या विकासासाठी जनतेने एनडीएला स्पष्ट बहुमत देऊन पुन्हा संधी दिली,' असं म्हणत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बिहारच्या जनतेचे हार्दिक आभार मानले आहेत.

बिहारमध्ये जोरदार टक्कर

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी सुरू झाली असली तरीही अद्याप या निवडणुकीचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालेलं नाही. अजूनही 20 टक्क्यांहून अधिक मतांची मोजणी होणं बाकी आहे. तसंच एनडीए आणि महाआघाडी यांच्या जागांमध्येही फारच कमी अंतर आहे. त्यामुळे या निवडणुकीचा संपूर्ण निकाल रात्री उशीरा स्पष्ट होण्याची चिन्ह दिसत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 10, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या