नवी दिल्ली, 17 एप्रिल : उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर (Ayodya Ram Mandir) उभारणीचे काम जोरात सुरू आहे. या भव्य मंदिरात राम लल्लाचे दर्शन (Ram Lalla Darshan) कधी होणार याची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर 2024मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील राम जन्मभूमी मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी शनिवारी ही माहिती दिली. मंदिराचे बांधकाम 30 टक्के पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
संक्रातीला राम लल्लाचे दर्शन होणार -
दिल्लीत आयोजित अयोध्या उत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान चंपत राय म्हणाले, 'मी यापूर्वी सांगितले होते की 2023 च्या अखेरीस रामजन्मभूमी मंदिराचे उद्घाटन होईल. मात्र, सूर्य दक्षिणायनमध्ये असल्याने त्याच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी, जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल तेव्हा भव्य मंदिराचे उद्घाटन करण्याचे आमचे ध्येय आहे. हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. तांत्रिकदृष्ट्या, 14 जानेवारीपूर्वीचा कोणताही दिवस हा मागील वर्षाचा शेवटचा दिवस असतो.
बांधकामाच्या प्रगतीची माहिती देताना राय म्हणाले की, भगवान राम बसण्यासाठी सहा फूट लांबीची ग्रॅनाइट खुर्ची बनवली जात आहे. “आम्ही आशा करतो की, या वर्षी, ऑगस्टमध्ये पाया आणि प्लिंथचे काम पूर्ण झाल्यानंतर, मंदिराचे बांधकाम सुरू होईल,” असेही राय म्हणाले. तसेच दगडी कोरीव कामही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरासाठी भूमिपूजन झाल्यानंतर काम सुरू करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिला होता निर्णय -
अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून ते मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिराची ताकद लक्षात घेऊन दक्षिण भारतातील सर्वात मजबूत नैसर्गिक ग्रॅनाइट दगडाचा वापर केला जात आहे. मंदिराच्या उभारणीचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनी करत असून टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स या कामात मदत करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 नोव्हेंबर 2019 च्या निर्णयानंतर, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला फेब्रुवारी 2020 मध्ये मंदिर बांधण्याचे काम देण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, Ram Mandir