बिहारमधून महाराष्ट्रात मुलांची तस्करी, RPFच्या कारवाईत धक्कादायक खुलासा

बिहारमधून महाराष्ट्रात मुलांची तस्करी, RPFच्या कारवाईत धक्कादायक खुलासा

ही सर्व मुले 7 ते 13 या वयोगटातली आहेत. या सर्व मुलांना मदरशांमध्ये घेऊन जात असल्याचं या मुलांसोबत असलेल्या आरोपीने सांगितलं. मात्र त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रं आढळली नाहीत.

  • Share this:

राकेश जाधव, रायपूर 27 जून : बिहारमधून महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी येतात हे आता काही नवं राहिलेलं नाही. महाराष्ट्रातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडमधली लोकं आता स्थिरावली आहेत. मात्र रेल्वे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत धक्कादायक खुलासा झालाय. महाराष्ट्रात मजुरीसाठी आणल्या जाणाऱ्या 33 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केलीय.

छत्तीसगडच्या राजनंदगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. हावड्यावरून मुंबईला जाणाऱ्या गाडीत संशयास्पद मुलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गाडीत S-5 आणि S-7 या डब्ब्यांमध्ये अशी मुलं असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने या डब्यांमध्ये तपासणी केली. तेव्हा त्यांना ही मुलं आढळली. या डब्यांमधून प्रवास करणाऱ्या एका वकिलाने ही माहिती पोलिसांना कळवली होती.

ही सर्व मुले 7 ते 13 या वयोगटातली आहेत. या सर्व मुलांना मदरशांमध्ये घेऊन जात असल्याचं या मुलांसोबत असलेल्या आरोपीने सांगितलं. मात्र त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्रं नव्हती. या मुलांना नंदूरबारमध्ये घेऊन जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मुलांसोबत तीन मोठ्या व्यक्ती होत्या त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आलंय. छत्तीसगड पोलीस बिहार पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाचा तपास करत आहेत.

सट्टा लावणाऱ्या PSIला अटक

विश्वचषकातील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला (पीएसआय) रंगेहात अटक करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर खरमाटे असे आरोपी पीएसआयचे नाव असून त्याच्यासह दोघांना पोलिसांनी दादरमधील एका हॉटेलमधून अटक केली आहे.

ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. या कारवाईनंतर त्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, सध्या विश्वचषक सुरु असल्यामुळे प्रत्येक सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे.

मिकीन शहा नावाचा व्यक्ती इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यावर फोनवरुन बेटिंग लावत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिस पथकाने दादरमधील एका हॉटेलवर धाड टाकली. यात दोन जण सट्टा खेळताना आढळून आले. या कारवाईत क्रिकेट बुकी मिकीन शाह आणि त्याचे दोन साथीदार मनीष सिंग आणि प्रकाश बनकर हे सट्टा लावत होते. यावेळी पीएसआय ज्ञानेश्वर खरमाटे हा देखील तिथेच होता. मिकीन शहा आणि दोन आरोपींसहित ज्ञानेश्वर खारमाटे याला अटक करण्यात आली. आरोपींकडून 1 लाख 93 हजार 200 रुपये रोख आणि सहा मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी माटुंगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता सगळ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

First published: June 27, 2019, 5:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading