राजस्थान लोकसभा : भाजपला पैकीच्या पैकी गुण देणाऱ्या या राज्यात पारडं फिरणार का?

2014 मध्ये राजस्थानात शत प्रतिशत भाजप निवडून आलं. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेत मात्र पक्षाचा सणकून पराभव झाला. यंदा लोकसभेला मतदान जास्त प्रमाणात झाल्यानं पारडं फिरू शकतं, असा अंदाज आहे.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 06:31 PM IST

राजस्थान लोकसभा : भाजपला पैकीच्या पैकी गुण देणाऱ्या या राज्यात पारडं फिरणार का?

जयपूर, 9 मे : गेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यात भाजपने पैकीच्या पैकी गुण मिळवत सर्व जागा खिशात घातल्या होत्या, त्यापैकी एक म्हणजे राजस्थान. पण या वेळी पारडं एकतर्फी झुकणार नाही, असा निवडणूक विश्लेषकांचा अंदाज आहे. यंदा लोकसभेला मतदानसुद्धा जास्त प्रमाणात झाल्यानं पारडं फिरू शकतं, असा अंदाज आहे. राजस्थानात दोन टप्प्यात झालेलं मतदान यंदा विक्रमी 68.2 टक्के  एवढं झालंय. गेल्या निवडणुकीत 64.2 टक्के मतदान झालं होतं. त्याच वेळी प्रचारात या वेळी मोदी फॅक्टर मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा या विषयाला लोकांनी स्थानिक विषयांपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर भाजपची सरशी होऊ शकते.

----------------------------------------------------------------------------------------------------

मतदानाची टक्केवारी

2019 : 68.2%

2014 :  64.2%

Loading...

-------------------------------------------------------------------------------------------------------

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपविरोधी वारं असल्याचं मानलं जातं. काँग्रेसनेही कंबर कसून जोरदार प्रचार केल्याने या राज्यात कुणाला किती जागा मिळणार याचा अंदाज बांधणं कठीण होतं.

2014 मध्ये वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातही सत्ता भाजपची होती. लोकसभेच्या 25 जागा सगळ्याच्या सगळ्या भाजपला मिळाल्या होत्या. हे राज्य देशात सत्ता मिळवून देण्यात भाजपसाठी महत्त्वाचं ठरलं होतं.   त्याच राजस्थानात विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपला पराभवाची चव चाखावी लागली. वसुंधराराजेंवर जनतेचा विश्वास नसल्याने पराभव झाला, असं राजकीय विश्लेषक सांगतात. आता काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि युवा नेते - उपमुख्यमंत्री सचिन पायलट काय करिष्मा दाखवतात याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे.


मतदारांची संख्या

महिला मतदार

20,346,580

पुरुष मतदार

22,648,051

एकूण मतदार

42,994,631




या दोन जागांवर आहे लक्ष

राजस्थानमध्ये दोन जागांवर भाजपला पूर्वी आपल्याच पक्षात असलेल्या दिग्गजांविरोधात लढा द्यावा लागला. माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह पश्चिम राजस्थानमध्ये असलेल्या सीमेनजिकच्या बाडमेर-जैसलमेर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. मानवेंद्र गेल्या निवडणुकांपर्यंत भाजपच्या गोटात होते.


भाजपचे आमदार म्हणूनही ते बाडमेरच्या शिव मतदारसंघातून निवडून आले होते. पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी वडील जसवंत सिंह यांना भाजपने तिकीट दिलं नाही आणि जसवंत सिंहांचं भाजपबरोबर पटेनासं झालं. तेव्हा मानवेंद्रही पक्षापासून दुरावले. राजस्थानात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी पक्षाशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मानवेंद्र सिंह यांना काँग्रेसने बाडमेर- जैसरमेरवर उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार कैलाश चौधरी लढत देत आहेत. ही लढत चुरशीही ठरत आहे.

राजस्थानमध्ये सीकर लोकसभा मतदारसंघातही असाच जुन्या आप्तांचा आपसात लढा आहे.


महरिया विरुद्ध सुमेधानंद



भाजपचे या प्रांतातले दिग्गज नेते असलेल्या सुभाष महरिया यांनाही भाजपने मागच्या निवडणुकीत तिकीट दिलं नाही. सुभाष महरिया वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. ते भाजपच्या तिकिटावर तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले होते. पण 2014 मध्ये भाजपने त्यांचा पत्ता कट करत दुसरा उमेदवार उभा केला. त्या वेळी ते अपक्ष म्हणून उभे राहिले पण भाजपच्या उमेदवारापुढे हार पत्करावी लागली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता पहिल्यांदाच ते काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत महरियांना हरवणारे भाजप खासदार स्वामी सुमेधानंद यांच्यापुढे त्यांचं आव्हान किती टिकणार हे लवकरच स्पष्ट होईल.

जयपूर ग्रामीणकडे लक्ष

जयपूर ग्रामीण या मतदारसंघाकडे राजस्थानच नाही, तर देशाचं लक्ष लागलं आहे. दोन ऑलिम्पियन एकमेकांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत. क्रीडा क्षेत्रातली दोन दिग्गज नावं एकमेकांपुढे असल्याने या लढतीकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

केंद्रीय मंत्री खासदार राज्यवर्धनसिंह राठोड यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. राज्यवर्धन यांनी नेमबाजीत ऑलिम्पिकचं रौप्य पदक जिंकलं होतं. मुळात भारतीय लष्करात होते. कर्नल पदापर्यंत त्यांची बढती झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये लष्करातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं. जयपूर ग्रामीण मधून राज्यवर्धन मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आणि केंद्रात राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आलं.

या मतदारसंघातून राज्यवर्धन याना टक्कर द्यायला काँग्रेसनेही क्रीडापटूला उभं केलं आहे. काँग्रेसच्या उमेदवार आहेत कृष्णा पुनिया. आघाडीच्या अॅथलिट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कृष्णा पुनिया भारतातर्फे तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळल्या. थाळी फेकीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. राजस्थान विधानसभेच्या आमदार म्हणून कृष्णा गेल्या वर्षी निवडून आल्या. 2013 मध्ये कृष्णाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

2014 ची जयपूर ग्रामीण स्थिती

राज्यवर्धनसिंह राठोड - भाजप - 632960

सी. पी. जोशी - काँग्रेस - 300034

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 09:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...