राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण

राहुल गांधींवर निशाणा साधल्याने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्येच जुंपलं भांडण

'कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्ष अनेक संकटांमधून गेला आहे.'

  • Share this:

 नवी दिल्ली 16 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) पराभव झाल्यानंतर काँग्रेसपक्षात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलं आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कपिल सिब्बल (kapil sibal ) यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला आहे. पक्षाने आत्मचिंतन करण्याची वेळही आता संपली असून काँग्रेस नेतृत्व कुठलाही पुढाकार घेत नसल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहेलोत (Rajasthan CM Ashok gehlot) यांनी सिब्बल यांच्यावर टीका केलीय पक्षांतर्गत मुद्दे जाहीर करण्याची सिब्बल यांना काहीही गरज नव्हती. माध्यमात जावून काहीही साध्य होणार नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. काँग्रेस नेत्यांमध्येच सोशल मीडियावर भांडण जुंपल्याने काँग्रेस अडचणीत आला आहे.

कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या देशभरातल्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. काँग्रेस पक्ष अनेक संकटांमधून गेला आहे. या संकटामधूनही पुन्हा एकदा काँग्रेस झेप घेईल असंही गहेलोत यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केलाय. संघटनेची माहिती असलेल्या, अनुभवी, कार्यकर्त्यांना समजून घेणाऱ्या नेत्यांना संघटनेत पुढे आणलं पाहिजे. मात्र नेतृत्वाकडून असे प्रयत्न होत नाहीत. जनाधार असलेल्या नेत्यांचा उपयोग ज्या प्रकारे करायला पाहिजे तसा होत नाही असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे. सिब्बल यांच्यासह पक्षातल्या 32 नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या पत्रानंतरही नेतृत्वा करणाऱ्यांच्या शैलीत कुठलाही बदल झाला नाही. त्यांच्याकडून संवादाचा प्रयत्नही झाला नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी माध्यमांकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता असंही सिब्बल यांनी म्हटलं आहे.

कपिल सिब्बल यांच्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा पक्षात वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणुकीत काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 16, 2020, 10:53 PM IST

ताज्या बातम्या