जोधपूर, 09 ऑगस्ट : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील एका शेतात 11 पाकिस्तानी शरणार्थींचे मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील हे 11 जण असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर जिल्ह्यातील देसू पोलीस स्टेशन परिसरातील लोदटा गावात हा भयंकर प्रकार समोर आला आहे. या 11 जणांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पाकिस्तानातून विस्थापित झालं होतं. 11 जणांना विष दिल्याचं सांगितलं जात आहे. विषबाधेमुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात असून यामध्ये हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे वाचा- दाभोळ खाडीत मच्छिमारांच्या बोटीला जलसमाधी, LIVE VIDEO मध्ये पाहा थरार
पोलीस अधिकारी हनुमान राम यांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब पाकिस्तानातून आलं होतं. एकाच कुटुंबातील सर्वांचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये 6 जणांसह 5 लहान मुलांचाही समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील नर्स असणारी बहिण आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी जोधपूरला आली होती. त्यानंतर इथेच राहायला लागली. काही लोकांचा असा अंदाज आहे की बहिणीने प्रथम या 10 लोकांना विषारी इंजेक्शन्स दिले आणि नंतर स्वत: लाही इंजेक्शन दिले आणि या सर्वांचा बळी घेतला.
कुटुंबात होते 12 लोक मृतदेह मिळाले 11
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिवारात एकूण 12 सदस्य राहात होते. रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीनं 10 जणांची हत्या करून स्वत:ला संपवलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. तर या कुटुंबातील एक सदस्य शेतात आधीच निघून गेला होता. रात्री त्याला शेतातच झोप लागल्यामुळे तो तिथेच राहिला आणि सकाळी उठून पाहिलं तर शेतात ही धक्कादायक घटना घडली होती.