भोपाळ 18 ऑगस्ट: मध्य प्रदेशमधल्या शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता सरकारी नोकरी ही फक्त स्थानिक तरुणांनाच मिळेल अशी घोषणा चौहान यांनी केली आहे. लवकरच असा कायदा करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हाच भूमिपूत्राचा मुद्दा मांडत असतात. त्यामुळे भाजप सरकारने राज ठाकरे यांच्या धोरणासारखीच ही घोषणा केल्याचं बोललं जातं आहे.
चौहान म्हणाले जे राज्याचे रहिवाशी आहेत त्यांनाच फक्त आता राज्यात सरकारी नोकऱ्या मिळतील. इतरांना मिळणार नाहीत. राज्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी पक्षाच्या स्थानेपासूनच हा मुद्दा चांगलाच लावून धरला होता. नंतर ते हिंदुत्वाच्या मुद्द्याकडेही वळले आहेत. मध्य प्रदेशात सध्या पोटनिवडणुका होत आहेत. त्यामुळेच चौहान यांनी हा मुद्द उपस्थित केल्याचीही चर्चा आहे.
कोरोनामुळे आधीच हजारो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. रोजगाराचं मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळेच राज्यातल्या तरुणांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. आता राज्यात नोकरी पाहिजे असेल तर त्याला रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.
चौहान सरकारला स्थिरता येण्यासाठी काही जागांची गरज आहेत. त्यामुळे पोटनिवडणूकीत जास्तित जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी चौहान यांनी जोर लावला असून या भावनिक मुद्याला हात घातल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh