News18 Lokmat

VIDEO राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' चुकीचा : गावकऱ्यांनी FB LIVE करून केला दावा

डिजिटल गावासंदर्भातला राज ठाकरे यांनी दाखवलेला व्हिडिओ खोटा असल्याचा दावा हरिसाल गावाने केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 08:54 PM IST

VIDEO राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ' चुकीचा : गावकऱ्यांनी FB LIVE करून केला दावा

मुंबई, 22 एप्रिल : पहिलं डिजिटल गाव म्हणून मोदी सरकारच्या काळात कौतुक झालं त्या विदर्भातल्या हरिसाल या गावाबद्दलचं 'वास्तव' दाखवणारा व्हिडिओ त्यांच्या जाहीर सभेत नुकताच दाखवला. पण या व्हिडिओत दाखवलेली बाजू चुकीची आहे आणि तो व्हिडिओच खोटा असल्याचा दावा हरिसाल गावातल्याच काही लोकांनी केला आहे. गाव डिजिटल आहे, हे सिद्ध करण्यासाठी उपसरपंचानं चक्क फेसबुक लाईव्ह करत डिजिटल रूम दाखवली आहे.

अमरावती जिल्ह्यातल्या हरिसाल गावाबाबतचा व्हिडिओ राज ठाकरेंनी सभेमध्ये दाखवला होता. हा व्हिडिओ चुकीचा असल्याचा दावा उपसरपंच गणेश महादेव येवले यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केला आहे. "राज ठाकरेंनी हरिसाल गावाची जी देशभरात बदनामी केली आहे. हरिसाल गावाविषयी जो व्हिडिओ दाखवला आहे, तो पूर्णपणे खोटा आहे", असं येवले म्हणाले.  "आज जर गावात इंटरनेट नसते तर आज मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधू शकलो नसतो", अशा त्यांनी या लाईव्ह व्हिडिओतून व्यक्त केल्या आहेत.

आमच्या गावाच्या शाळेत काँप्युटर लॅब देण्यात आली आहे. येथे एचपी, माइक्रो सॉफ्ट, जल्दीफाय अशा कंपन्यांच्या मदतीने तंत्रज्ञान पोहोचले आहे. गावातील इंटरनेट व्यवस्थित काम करतंय, असेही त्यांनी यावेळी सांगितले. राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात हरिसालची बदनामी करत आहेत, त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी हे केले आहे, असंही ते या व्हिडिओमध्ये  त्यांनी म्हटलं आहे. यासबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.



Loading...

'गाव डिजिटल झाल्यामुळे पर्यटनास फायदा'

उपसरपंच येवले यांनी गावातल्या महिला आणि इतर तरुणांनाही या लाईव्ह व्हिडिओत बोलतं केलं आहे. शिवाय त्यांनी डिजिटल रूमही यात दाखवली आहे. "हरिसाल गाव जेव्हापासून डिजिटल झाले आहे, तेव्हापासून गावाच्या पर्यटनाला त्याचा फायदा झाला आहे. आम्ही एकूण दहा गाईड या गावात काम करतो. मात्र गावाच्या पर्यटनाविषयी जनतेला माहिती मिळाली ती फेसबुक आणि व्हॉट्सअॅपमुळे", अशी माहिती अशोक आठवले या गावकऱ्यानी यावेळी दिली. गाव डिजिटल झाल्यापासून गावाला इंटरनेट सुविधा मिळाली ज्यामुळे गावाच्या पर्यटनाविषयी माहिती देणारे फेसबुक पेज सुरू करता आलं, असं ते सांगतात.



गावातील काही विद्यार्थिनी आणि महिलांशी संवाद साधलेला या व्हिडिओत दिसतो.  "इंटरनेट आल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला आहे. यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे. अनेक महिलांना येथे मशीन ट्रेनिंग देण्यात आले आहे. ऑनलाइन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना शिवणकाम, बॅग्स बनविण्याचे काम अशा अनेक कामांचे प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे हरिसाल गावातील महिला सक्षम झाल्या आहेत", असं एका महिलेनं सांगितलं.

उपसरपंचांनी येथील विविध दुकानदारांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी इंटरनेट व्यवस्थित चालत असल्याचे सांगितलं. "आम्हाला कुणीही हे बोलण्यास भाग पाडलेलं नाही", असंही काही गावकरी व्हिडिओतून सांगताना दिसतात.

'राजकारण खालच्या पातळीचं'

हरिसाल गावातील पंचायत समिती सदस्य रामविलास दहिकर यांनी यावेळी सांगितले की, "गावात इंटरनेट आल्यामुळे तसेच गाव डिजीटल झाल्यामुळे येथील युवकांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. इंटरनेटमुळे येथील युवा पिढीला अनेक गोष्टींची, रोजगाराची, स्पर्धा परीक्षांची माहिती मिळते, त्यामुळे राज ठाकरे यांनी जे आरोप हरिसाल गावावर लावले आहेत, ते खोटे आहेत व ते  अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत असंही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपसरपंचांनी डिजीटली या गावात काय शक्य आहे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी  ऑनलाइन पैसे ट्रांसफर करणे, ड्रायव्हिंग लायसेंससाठी तसेच आधार कार्ड साठी ऑनलाइन फॉर्म भरणे अशा सर्व गोष्टी हरिसाल गावात शक्य असल्याचे या व्हिडिओ मधून स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात मनसेशी संपर्क साधायचा प्रयत्न केला, पण पक्षाच्या प्रवक्त्यांपर्यंत आम्ही अद्याप पोहोचू शकलेलो नाही. यासबंधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रतिक्रिया आली की बातमी अपडेट करण्यात येईल.


SPECIAL REPORT : राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, लावा रे तो व्हिडिओ!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 08:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...