13 मे: राज्यासह मध्य आणि उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू असताना मे महिन्याच्या अखेरीस पश्चिम हिंदी महासागरात मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्याचे दिलासादायक संकेत हवामानतज्ज्ञांनी दिले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजांनुसार मान्सूनचे केरळमधील आगमन मे अखेरीस म्हणजेच सर्वसाधारण वेळेच्या दरम्यान होण्याची शक्यता अधिक आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनेही मान्सूनच्या केरळमधील आगमनाचा अंदाज शनिवारी जाहीर केला. या अंदाजानुसार २८ मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात दोन दिवस पुढे- मागे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. तसंच हवामान खात्याने यंदा समाधानकारक पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला आहे.
गेली दोन वर्षं देशात समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. तसंच पाण्याची भीषण टंचाई मध्य आणि उत्तर भारताला अनुभवायला लागली होती. या सगळ्या परिस्थितीत यंदा समाधानकारक पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. केरळाहून राज्यापर्यंत मान्सून यायला साधारण 10 दिवसांचा कालावधी जातो.
यंदाचा मान्सून समाधानकारक ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.