रायपूर, 16 ऑगस्ट : रेल्वे ट्रॅक (railway track) सोडून एक रेल्वे इंजिन (railway engine) खांब तोडत आणि सिग्नल मोडत थेट रस्त्यावर (on the road) आल्यामुळं नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. रेल्वेचं फाटक (railway gate) मोडत मोटरमन (motorman) नसलेलं हे इंजिन रस्त्यावर पाहून अनेकांना काय करावं, ते सुचेना. रेल्वेचं हे इंजिन असं अचानक ट्रॅक सोडून रस्त्यावर कसं काय आलं, असा प्रश्न सगळ्यांचा पडला.
एक इंजिन आलं रस्त्यावर
ही घटना घडली छत्तीसगडमधल्या बिलासपूर रेल्वे स्टेशनपाशी. इथल्या सिरगिट्टी रेल्वे फाटकापाशी एक इंजिन ट्रॅक सोडून बाहेर पडलं. मोटरमन नसताना हे इंजिन अचानक सुरू झालं आणि रेल्वे ट्रॅकवरून काही अंतर गेलं. त्यानंतर ट्रॅकवरील खांबांना धडकून या इंजिनाने ट्रॅक सोडला आणि ते फाटकाच्या दिशेनं वळलं. मग फाटक तोडून ते रस्त्यावर आलं.
वाहतुकीच्या रस्त्यावर इंजिन
हे इंजिन ज्या रस्त्यावर आलं, तो बिलासपूरमधील अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. मात्र ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी इंजिनाच्या समोर कुणीही न आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हे इंजिन रस्त्यावर आल्याचं समजल्यावर नागरिकांनी आरडाओरडा करत एकमेकांना सावध केलं आणि इंजिनाच्या मार्गातून प्रत्येकजण बाजूला हटला. साधारण 200 मीटर चालल्यानंतर हे इंजिन थांबलं. मोटरमनशिवाय चालणारं आणि ट्रॅक सोडून रस्त्यावर आलेलं हे इंजिन पाहून अनेकांची भंबेरी उडाली, अशी बातमी 'दैनिक भास्कर'ने दिली आहे.
हे वाचा -कोरोना Delta Variant चं थैमान सुरू; सोमवार ठरला भयंकर!
रेल्वेकडून चौकशी सुरू
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रायपूरकडून आलेल्या डबर पॉवर मालगाडीचं हे इंजिन होतं. या गाडीला दोन इंजिन लावण्यात आले होते. त्यापैकी एका इंजिनात कुणीही मनुष्य नव्हता. या इंजिनात काही तांत्रिक बिघाड होऊन ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वेकडून या प्रकाराची चौकशी सुरू असून या घटनेची कुठलंही ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chattisgarh, Railway accident