राहुल गांधी दोन ठिकाणाहून लढणार लोकसभा निवडणूक, हा आहे दुसरा मतदारसंघ

काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 12:02 PM IST

राहुल गांधी दोन ठिकाणाहून लढणार लोकसभा निवडणूक, हा आहे दुसरा मतदारसंघ

नवी दिल्ली, 31 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन ठिकाणांहून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेश आणि केरळ या दोन राज्यातील मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत ज्येष्ठ नेते ए.के.एन्टनी यांनी दिली. राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाड येथूनही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याआधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनीदेखील यापूर्वी दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि जिंकलीही होती. त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा वायनाड आणि अमेठी या दोन्ही जागा लढवणार आहे.

केरळमधली वायनाडची जागा सध्या रिक्त आहे. 2014 मध्ये निवडून आलेले खासदार एम. एल. शहनवाझ यांचं सहा महिन्यापूर्वीच निधन झालं. त्यामुळे वायनाडच्या जागेवर कोणीही उमेदवार नव्हता. केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुलापल्ली रामचंद्रन यांनी वायनाडमधून राहुल यांनीच निवडणूक लढावी यासाठी आग्रह धरला होता. अखेर राहुल गांधी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाला.

राहुल गांधी यांनी  कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातून निवडणूक लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावर, 'मला त्यांच्या राज्यातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे', असं राहुल गांधींनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन वायनाडमधून निवडणूक लढवण्याला होकार दिला. वायनाड मतदार संघाची निवड करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, हा मतदारसंघ केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांना जोडतो. दक्षिणेतील तीन राज्यांचं त्रिकोण असलेल्या या मतदारसंघाची निवड केल्यामुळे तिन्ही राज्यातील कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण झाली आहे.

राहुल गांधी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांनीही दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली अशी आठवण करून देत आता राहुल गांधीही दोन ठिकाणाहून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीसोबतच आणखी एका मतदारसंघातून लढणार, अशी चर्चा होती. अमेठी ही माझी कर्मभूमी आहे पण आणखी एका ठिकाणाहूनही मी लढू शकतो, असं राहुल गांधींनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं होतं. 2014  च्या निवडणुकीत त्यांनी अमेठीमधून स्मृती इराणी यांचा पराभव केला होता. याही वेळी स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यात लढत होणार आहे.

Loading...

भाजपला काँटे की टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मैदानात उतरवलं जाणार का, असंही राहुल गांधींना विचारण्यात आलं होतं. त्यावर आम्ही जुन्या आणि नव्या अशा दोन्ही नेत्यांना संधी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं. याआधी, सोनिया गांधींनी कर्नाटकमधल्या बेल्लारीमधून निवडणूक लढवली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही कर्नाटकमधल्या चिकमंगळूरमधून लढल्या होत्या.


VIDEO: भावा कुणाची हवा; भंडारा-गोंदिया मतदारसंघात कोण मारणार बाजी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...