चेन्नई, 30 जानेवारी : तामीळनाडूच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय होत आहे. तामीळनाडूतल्या एका कुकिंग शोमध्ये राहुल गांधींनी हजेरी लावली, तसंच त्यांनी स्थानिकांबाबत जेवणही केलं. मागच्या आठवड्यात राहुल गांधी निवडणूक प्रचारासाठी तामीळनाडूला गेले होते. यावेळी ते युट्यूब चॅनल असलेल्या 'व्हिलेज कुकिंग चॅनल'वर (Village Cooking Channel) पाहुणे म्हणून आले. 14 मिनिटांचा हा एपिसोड शुक्रवारी युट्युबवर अपलोड करण्यात आला. मशरूम बिर्याणी (Mushroom Biryani) बनवत असलेल्या सगळ्या कूकना राहुल गांधीनी वणक्कम म्हणत नमस्कार केला.
तामीळनाडूच्या करुर मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार ज्योतीमणीही राहुल गांधी यांच्यासोबत होत्या. बिर्याणी केल्यानंतर राहुल गांधींनी रायता करायला स्थानिकांना मदत केली. यावेळी त्यांनी रायता बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सगळ्या पदार्थांचा तामीळ भाषेत वनग्याम (कांदा), थायरू (दही), काल उप्पू (मीठ) असा उल्लेख केला. रायतं बनवल्यानंतर राहुल गांधींनी त्याची चवही घेतली.
बिर्याणी आणि रायता बनवल्यानंतर राहुल गांधी सगळ्यांसोबत चटईवर बसले आण त्यांची विचारपूस केली. परदेशात जाऊन स्वयपाक करण्याची इच्छा यावेळी स्थानिकांनी बोलून दाखवली. राहुल गांधींनीही अमेरिकेतल्या आपल्या मित्राला याबाबत सांगण्याचं आश्वासन दिलं.
राहुल गांधींनी या युट्युब चॅनल चालवणाऱ्यांना देशातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जाऊन खाद्यसंस्कृती अनुभवण्याचा सल्लाही दिला. सगळ्या सबस्क्रायबर्ससाठी एक दिवस मेजवानी द्यायची इच्छा युट्युब चालवणाऱ्यांनी बोलून दाखवली, तेव्हा राहुल गांधींनीही आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहू असं सांगितलं.
राहुल गांधींनी ग्रामस्थांसोबत बसून केळ्याच्या पानावर मशरूम बिर्याणी आणि रायतं खाल्लं. जेवण झाल्यानंतर त्यांनी 'नल्ला इरूकू' (चांगलं झालं) अशी प्रतिक्रिया दिली. तसंच पुढच्या वेळी येईन तेव्हा दुसरं काहीतरी खायला द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
तामीळनाडू विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी कोईम्बटूर आणि तिरुपूरमध्ये गेले होते. या दौऱ्यात त्यांनी उद्योजकांशी अर्थव्यवस्थेवर चर्चा केली, तर शेतकऱ्यांसोबत केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरून चर्चा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Village