नवी दिल्ली, 4 मार्च : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'पंतप्रधानजी, तुम्हाला जराही लाज वाटत नाही का?' असा सवाल करत अमेठीतील सभेत नरेंद्र मोदी खोटं बोलले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
'पंतप्रधानजी, अमेठीतील ऑर्डिनेंस फैक्ट्रीचं भूमीपूजन मी स्वत: 2010 साली केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून तिथं लहान शस्त्रास्त्रांचं उत्पादन सुरू आहे. काल आपण अमेठीत आला आणि सवयीनुसार खोटं बोललात. तुम्हाला जराही लाज वाटत नाही का?' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी अमेठी या राहुल गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघात जात रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचे तसंच विविध विकासकामांचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमानंतर त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित करताना 'मेड इन अमेठी' मुद्यावर राहुल गांधींना टोला लगावला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''अत्याधुनिक रायफल एके-203 रायफलची अमेठीत निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प 8-9 वर्षापूर्वीच सुरू होणं अपेक्षित होते. अत्याधुनिक रायफल बनवण्यासाठी कोरबामध्ये कारखान्याची स्थापना करण्यात आली होती, पण त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला नाही. प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन तीन वर्ष लोटली, पण येथे कोणत्या शस्त्राची निर्मिती केली जाईल?, याबाबत पूर्वीचे सरकार ठोस निर्णय घेऊ शकले नाही''.
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर शाब्दिक वार करत म्हटलं की, काही लोक येता-जाता मेड इन उज्जैन, मेड इन जयपूर, मेड इन इंदूरसंदर्भात भाषण देत फिरत आहेत. पण हा मोदी आहे ज्याने 'मेड इन अमेठी' चे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
नरेंद्र मोदींच्या याच दाव्यावरून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
उदयनराजेंनी कुणाला म्हटलं, 'I Love You So Much'? पाहा व्हिडिओ