नवी दिल्ली, 16 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते जयराम रमेश हे राहुल गांधींची चूक सुधारताना दिसत आहेत. लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये घडलेली ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे, यानंतर राहुल गांधींवर निशाणा साधण्यात येत आहे. मी दुर्दैवाने खासदार आहे, असं राहुल गांधी या पत्रकार परिषदेत म्हणाले, यानंतर जयराम रमेश यांनी राहुल गांधींना मध्येच टोकलं आणि त्यांना हे वक्तव्य सुधारायला सांगितलं.
राहुल गांधी पत्रकार परिषदेत इंग्रजीमध्ये बोलत होते, तेव्हा त्यांच्या एका बाजूला केसी वेणुगोपाल आणि दुसऱ्या बाजूला जयराम रमेश बसले होते. राहुल गांधींनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून भाजपने टीका केली आहे, त्यावर राहुल गांधींना प्रत्युत्तर द्यायचं होतं. हे उत्तर देत असतानाच जयराम रमेश यांनी राहुल गांधींना रोखलं आणि वाक्य सुधारायला सांगितलं. हा सगळा प्रकार होत असताना माईक ऑन होता, त्यामुळे जयराम रमेश यांनी राहुल गांधींना काय सांगितलं हे रेकॉर्ड झालं.
'दुर्दैवाने मी एक खासदार आहे आणि मला संसदेत बोलायला दिलं जाईल, त्यामुळे सगळ्यात आधी मी संसदेच्या पटलावर माझं म्हणणं मांडेन आणि त्यानंतर तुमच्याशी चर्चा करेन, तसं झालं तर मला आनंद होईल,' असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर लगेच जयराम रमेश यांनी राहुल गांधींना थांबवलं. 'दुर्दैवाने मी खासदार आहे, असं तुम्ही म्हणालात, यावरून तुमचा विनोद केला जाईल,' असं जयराम रमेश राहुल गांधींना म्हणाले.
It's unfortunate that @RahulGandhi ji is an MP in our Parliament, as he consistently undermines and betrays our nation. It's concerning that he can't even make a statement without being coached. Who is coaching him for his foreign intervention statement? pic.twitter.com/DSBF7WDMwW
— Varun Puri 🇮🇳 (@varunpuri1984) March 16, 2023
जयराम रमेश यांनी हे सांगितल्यानंतर राहुल गांधींनी लगेच स्पष्टीकरण दिलं. 'मी स्पष्ट करू इच्छितो की मी दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, कारण आरोप संसदेमध्ये 4 मंत्र्यांनी केले आहेत आणि मला उत्तर द्यायची संधी देणं हा माझा लोकतांत्रिक अधिकार आहे. जर भारताचं लोकतंत्र काम करत असेल तर मी माझी बाजू संसदेत मांडू शकेन,' अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.
राहुल गांधींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेते शहजाद पुनावाला यांनी टोला लगावला आहे. 'जयरामजी ही आमच्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे, की या महान संसदेत एक खादसार आहे, ज्याची ते वाईट पद्धतीने उपेक्षा आणि अपमान करतात. ट्रेनिंगशिवाय ते एकही वक्तव्य करू शकत नाहीत, हे दु:खद आहे. लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावेळी त्यांनी कोणाचं ट्रेनिंग घेतलं होतं,' असा सवाल शहजाद पुनावाला यांनी विचारला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Rahul gandhi