नवी दिल्ली, 10 जून : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांना नव्याने घरं देण्यात येणार आहेत. यासाठी लोकसभेच्या सचिवालयाने रिकाम्या घरांची यादी बनवली आहे. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या रिकाम्या घरांच्या यादीत राहुल गांधींच्या घराचंही नाव आहे.
12 तुघलक लेन
राजधानीतलं '12 तुघलक लेन' हे राहुल गांधींचं अधिकृत निवासस्थान. 2004 साली राहुल गांधी जेव्हा अमेठीतून खासदार झाले तेव्हापासून ते याच घरात राहतात. राहुल गांधींचं हे निवासस्थान घरांच्या उच्च श्रेणीमध्ये येतं. पण आता मात्र लोकसभेच्या सचिवालयाच्या यादीत त्यांचं घर रिकाम्या घरांच्या यादीत टाकण्यात आलं आहे.
लोकसभेच्या नियमांप्रमाणे जे खासदार नव्याने निवडून येतात त्यांना देण्यात येणाऱ्या घरांची यादी बनवली जाते आणि मग ही घरं नव्या खासदारांना दिली जातात.
अमेठीतून हरले, वायनाडमधून जिंकले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीमधून निवडणूक हरले असले तरी केरळमधल्या वायनाडमधून निवडणूक जिंकले आहेत. असं असलं तरी राहुल गांधींना दिल्या जाणाऱ्या घराचा दर्जा कमी होणार, अशीच चिन्हं आहेत.
यावेळी खासदारांना 517 फ्लॅट्स आणि बंगले दिले जाणार आहेत. त्यानुसार राहुल गांधींना हे घर सोडावं लागू शकतं.
एएनआय या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. या वृत्तसंस्थेकडे संसदेच्या सचिवालयाने काढलेलं पत्रक आहे. यामध्ये राहुल गांधींच्या 12 तुघलक लेन या घराचा पत्ता दिला आहे.
राजीनाम्याच्या चर्चेत भर
याबदद्ल राहुल गांधींच्या कार्यालयातल्या व्यक्तींना मात्र काहीही माहिती नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. पण जर राहुल गांधींचं घर वाटप केल्या जाणाऱ्या घरांच्या यादीत असेल तर त्यांना हे घर सोडावं लागू शकतं. आधीच राहुल गांधींच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून उलटसुट चर्चा सुरू आहेत. त्यातच या घराच्या चर्चेचीही भर पडली आहे.
===========================================================================================
SPECIAL REPORT : बाॅलिवूडची फिटनेस क्वीन ठाकरेंच्या रिअल 'टायगर'सोबत?