राहुल गांधींची ही माघार की मास्टरस्ट्रोक?

राहुल गांधींची ही माघार की मास्टरस्ट्रोक?

वायनाडमध्ये डाव्या पक्षांमध्ये जोरदार टक्कर असताना राहुल गांधींनी ही जागा का निवडली, असा प्रश्न विचारला जात आहे. पण वायनाड आणि जवळच्या मतदारसंघातली मतदारांची रचना बघता राहुल गांधींसाठी ही अत्यंत सुरक्षित जागा आहे, असा काँग्रेसचा होरा आहे.

  • Share this:

वायनाड, 4 एप्रिल : अमेठीमधून इतकी वर्षं लढणाऱ्या राहुल गांधींनी पहिल्यांदाच केरळमधल्या वायनाडमधून अर्ज भरला आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी वायनाडमध्ये भव्य रोड शो ही केला. त्यांच्या या रोड शो मध्ये प्रियांका गांधीही सहभागी झाल्या होत्या.

'मी फक्त उत्तरेतच नाही तर दक्षिणेतूनही लढतो, असा संदेश मला या उमेदवारीतून द्यायचा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. रोजगार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून त्यांनी भाजपवर हल्ला चढवला पण मी कम्युनिस्ट पक्षावर टीका करणार नाही, असंही ते म्हणाले.

वायनाडमध्ये राहुल गांधींनी केलेल्या रोड शो ला चांगला प्रतिसाद मिळाला.इथे काँग्रेसने मुस्लीम लीग या पक्षाशी युती केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांचीही राहुल गांधींना भेटण्यासाठी झुंबड उडाली होती.

डाव्या पक्षांचा गड

वायनाड हा डाव्या पक्षांचा गड मानला जातो. सीपीएम आणि सीपीआय या दोन्ही डाव्या पक्षांमध्ये इथे जोरदार टक्कर असताना राहुल गांधींनी ही जागा का निवडली, असा प्रश्न विचारला जात आहे. पण वायनाड आणि जवळच्या मतदारसंघातली मतदारांची रचना बघता राहुल गांधींसाठी ही अत्यंत सुरक्षित जागा आहे, असा काँग्रेसचा होरा आहे.

काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या पक्षाचं वायनाडमधल्या विधानसभा जागांवर चांगलं वर्चस्व आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत याच भागात युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला चांगलं यश मिळालं होतं. राहुल गांधींच्या रोड शो ला मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांचा इथे दणदणीत विजय होईल, अशी शक्यता आहे.

'राहुल गांधी अमेठीतून गायब'

राहुल गांधींनी वायनाडमधून अर्ज भरल्यानंतर भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी अमेठीमध्ये त्यांच्यावर हल्ला चढवला. अमेठीमध्ये १५ वर्षं सत्ता भोगल्यानंतर राहुल गांधी अमेठीतून गायब झाले हा इथल्या जनतेचा अपमान आहे, असं त्या म्हणाल्या.

राहुल गांधींना अमेठीमधून मिळणारा पाठिंबा कमी झाल्यामुळेच त्यांनी वायनाडचा रस्ता धरला, असाही आरोप स्मृती इराणी यांनी केला.

याआधी अमेठी हा गांधी घराण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ होता. पण आता राहुल गांधींच्या उमेदवारीच्या निमित्ताने काँग्रेसने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. म्हणूनच, आतापर्यंत दक्षिणेतल्या मतदारांकडे दुर्लक्ष झालं आहे, असा सूर लावत राहुल गांधींनी आपल्या प्रचाराची सुरुवात वायनाडमधून केली.

राहुल गांधींनी अमेठीतून माघार घेतली, अशी टीका त्यांच्यावर होते आहे. त्याचवेळी केरळमधून लढण्याचा त्यांचा निर्णय हा काँग्रेससाठी मास्टरस्ट्रोक ठरणार का हे पाहावं लागेल.

===============================================================================================================================================================

VIDEO: वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

First published: April 4, 2019, 4:08 PM IST

ताज्या बातम्या