वायनाड, २० एप्रिल : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना राहुल गांधींच्या प्रचारासाठी वायनाडमध्ये सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांचा एकेरी नावाने उल्लेख केला आणि राजीव गांधींना चोर म्हटलं त्या नरेंद्र मोदींना मिठी मारण्याचं धैर्य माझ्या भावाने दाखवलं, असं प्रियांका गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधींना भाजपने लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींच्या शिक्षणाबदद्ल भाजपने प्रश्न उपस्थित केले. देशासाठी शहीद झालेले आमचे वडील राजीव गांधी यांना चोर म्हणून हिणवण्यात आलं. तरीही राहुल गांधींनी नरेंद्र मोदींबद्दल राग धरला नाही,असं प्रियांका गांधींना म्हणायचं होतं.
भावाची बाजू मांडली
लोकसभेच्या अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी राहुल गांधींनी भाषण केलं. तुम्ही मला कितीही बोल लावा, मला पप्पू म्हणा पण मी तुमच्याबद्दल कोणतीही द्वेषभावना ठेवणार नाही, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना मिठी मारली होती. राहुल गांधींच्या या कृत्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही क्षणभर राहुल गांधींना कसा प्रतिसाद द्यावा हे लक्षात आलं नाही. या घटनेची प्रियांका गांधी यांनी आठवण करून दिली.
'जो द्वेष करेल त्याला मिठी मारा'
कुणी तुमचा द्वेष करत असेल तर जाऊन त्याला मिठी मारा. विश्वास ठेवा, मिठीमध्ये जादू आहे, असंही राहुल गांधींनी नंतर म्हटलं होतं. मोदींना प्रेमाची गरज आहे,अशी टिप्पणी त्यांनी केली होती.
मी तुमच्यापुढे एक बहीण म्हणून उभी आहे. मी ज्या माणसाला त्याच्या जन्मापासून ओळखते त्याच्याबद्दल मी खात्रीने बोलू शकते, असं प्रियांका म्हणाल्या. राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षांत अनेक हल्ल्यांना तोंड दिलं आहे. राहुल गांधी जसे आहेत त्यापेक्षाही वेगळं चित्र विरोधकांनी उभं केलं आहे, असं म्हणत प्रियांकांनी मतदारांसमोर भावाची बाजू घेतली.
राहुल गांधींच्या 'न्याय' योजनेचीही त्यांनी तरफदारी केली. तरुणांना रोजगार आणि गरिबांना शिक्षण देण्याला आमचं प्राधान्य आहे, असं त्या म्हणाल्या.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, अशी आश्वासनं मोदींनी दिली होती. पण सत्तेत आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला, या आरोपाचा प्रियांका गांधींनी पुनरुच्चार केला.
======================================================================================
VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे