नवी दिल्ली 1 जानेवारी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी 2019 हे वर्ष कसोटीचं राहणार आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतरची त्यांची ही सर्वात मोठी परिक्षा असणार आहे. राहुल गांधी यांनीही त्यासाठी कंबर कसलीय. 2014 चे राहुल गांधी 2019 ला दिसणार नाहीत याचीच झलक त्यांच्या वाढत जाणाऱ्या आक्रमकपणातून दिसून येते.
शांत, सौम्य, काहीसे भीडस्त असा राहुल गांधीचा स्वभाव. तर नरेंद्र मोदी नेमके त्याच्या उलट. आक्रमक, प्रभावी वक्तृत्व आणि कुणाचीही भीड भाड न ठेवता आपला मुद्दा मांडणारे, प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असणारे. त्यामुळं राहुल गांधी मोदींपुढे कसे टिकणार याची चर्चा गेली काही वर्ष होत होती.
त्याला राहुल गांधींचा स्वभावही कारणीभूत होता. मार्च 2004 मध्ये ते सक्रिय राजकाणात आले आणि त्याच वर्षी मे महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते अमेठीमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडुन आले. तेव्हापासून त्यांच्याविषयी लोकांमध्ये आकर्षण असलं तरी गंभीर राजकारणी म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली नाही.
बोलण्यात नसलेला नेमकेपणा. मुलाखतीतल्या प्रश्नांना तोंड देताना होणारी तारांबळ, वारंवार सुट्टीवर जाणं यामुळे त्यांची पार्ट टाईम राजकारणी अशी प्रतिमा निर्माण झाली. 2004 पासून ते 2018 पर्यंत त्यांनी कायम दुय्यम भूमिका घेत सोनिया गांधींच्या मार्गदर्शनाखाली राजकारण केलं.
राहुल गांधी यांनी पुढं येत पक्षाचं नेतृत्व करावं अशी मागणी वारंवार होत होती मात्र राहुल कधी पुढं आले नाहीत. नंतर सोनिया गांधींनीही आजारपणामुळं राजकारणातली आपली सक्रियता कमी केली. राहुल यांना काँग्रेसचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आणि ते पक्षाचा कारभार अधिकारवाणीने पाहू लागला. पण अध्यक्षपद स्वीकारायला त्यांना 2018 हे वर्ष उजेडावं लागलं.
या काळात त्यांची सोशल मीडियावरून यथेच्छ टिंगल-टवाळी झाली. 'पप्पू' हे विशेषण चिकटलं. या सगळ्या वातावरणाचा अनुकूल परिणाम झाला आणि राहुल गांधी बदलायला लागले. याच टिंगल टवाळीमुळे मी शिकलो, बदललो आणि जास्त मजबूत झालो असं राहुल गांधी यांनीच सांगितलं होतं.
त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींनी स्वत:ला ग्रुम केलं. बदललं. त्यामुळे राहुल आत आक्रमक झाले आहेत. मोदींवर ते थेट हल्लाबोल करतात. विधानसभा निवडणुकीत त्याचा त्यांना फायदाही झाला. त्यामुळे 2019 मध्ये त्यांचा पूर्ण नवा अवतार बघायला मिळणार आहे.
हे राहुल गांधी आक्रमक, थेट हल्लाबोल करणारे, अधिक परिपक्व आणि राजकीय व्यवहार चातुर्य असणारे नेते म्हणून दिसणार आहेत. त्यामुळे भाजपला त्यांना आता टाळता येणार नाही.