नवी दिल्ली, 23 जानेवारी: लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी काँग्रेसने मास्टरस्ट्रोक मारला आहे. गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जाणारी मागणी अखेर आज पूर्ण झाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका गांधी यांना पक्षातील महासचिव जबाबदारी सोपवली आहे. राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्यावर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवली आहे.
प्रियांका गांधींना लोकसभेसाठी उमेदवारी देण्याची मागणी
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. आता प्रियांका गांधी यांना भोपाळमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसमधून होऊ लागली आहे.
Many congratulations to Shri K C Venugopal, Smt. Priyanka Gandhi Vadra and Shri @JM_Scindia on their new appointments. We're fired up & ready to go! https://t.co/q7sMB8m6DO
— Congress (@INCIndia) January 23, 2019
प्रियांका गांधी यांनी पक्ष संघटनेत यावे अशी मागणी काँग्रेस नेत्यांपासून ते सर्व सामान्य कार्यकर्त्यांकडून नेहमी केली जात असे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रचार सभेत देखील त्या काही वेळी दिसल्या होत्या. पण त्यांनी पक्षातील कोणतीही जबाबदारी स्विकारली नव्हती. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेसची हा मास्टरस्टोक असल्याचे मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यात प्रियांका महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे काँग्रेस नेत्यांना वाटते म्हणूनच त्यांना उत्तर प्रदेश सारख्या महत्त्वाच्या राज्यातील जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. प्रियांका या रायबरेलीतून निवडणूक लढवणार अशी शक्यता पूर्वीपासून सुरू आहे. परंतु, आता प्रियांका गांधींना भोपाळमधून उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.
भाजपचा गड हिसकवण्यासाठी प्रियांकांच्या उमेदवारीची मागणी केली जात आहे. भोपाळ शहरात प्रियांका गांधींचे मोठमोठे पोस्टर्स पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे प्रियांका गांधींच्या राजकीय इनिंगची भोपाळमधून सुरूवात होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
प्रियांका गांधी यांच्या नियुक्ती बरोबरच राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. तर के.सी.वेणूगोपालराव यांना कर्नाटकचे महासचिव करण्यात आले आहे. गुलाब नबी आझाद यांच्याकडे हरियाणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान, भाजपसोबत केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेने प्रियांका यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रियांका यांचे स्वागत केले आहे.