मुंबई 7 जानेवारी : आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा बाजारावर परिणाम होत असतो. देशात सध्या निवडणुकीचं वातावरण आहे. राजकीय वातावरणही गरम आहे. आणि लोकांना राजकारणावर बोलायलाही कायम आवडत असतं. या वातावरणात दोन नेत्यांची कायम चर्चा होते. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी.
संक्रांतीला आता फक्त सात दिवस राहिले आहेत. संक्रात म्हटलं की सगळ्यांना ज्वर चढतो तो पंतगोत्सवाचा. त्या त्या वेळच्या सामाजिक वातावरणाचं प्रतिबिंब हे पतंगांवर बघायला मिळतं. सध्या राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा असल्याने यावर्षी पतंगांवर राहुल आणि मोदींची प्रतिमा बघायला मिळणार आहे. काही पतंगांवर राहुल गांधींची, काहींवर मोदींची तर काही पतंगांवर दोघांचीही छबी दिसून येत आहे.
सध्या या पतंगांना जोरदार मागणी असल्याचं पतंग विक्रेत्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र, झारखंड आणि उत्तर प्रदेशात असे लाखो पतंग तयार झाले असून त्याची विक्रीही धडाक्यात सुरू आहे.
त्यामुळे राजकारणाच्या आखाड्यात भांडणारे हे नेते आता आकाशातही एकमेकांशी भिडणार आहेत.
यात कुणाचं पारडं जड राहतं ते लवकरच कळणार आहे. आकाशातली ही लढाई खेळातली असती तरी या दोन नेत्यांमध्ये मे महिन्यात 'काँटे की लढाई' होणार आहे. या लढईत कोण कुणाचा दोरा कापतो त्यावरच दिल्लीची गादी कुणाला मिळणार हे ठरणार आहे.
मंत्रालयात पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न; पहा LIVE VIDEO