27 जानेवारी : भाजपच्या नेत्यांची प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान सुरूच आहे. आता भाजपने नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना स्वामी म्हणाले की, 'त्यांना (प्रियांका) एक आजार आहे, त्याला बायपोलॅरिटी असं म्हणतात. हा आजार सार्वजनिक ठिकाणी अनुकूल नाही. या आजाराने ग्रस्त असलेली लोकं हिंसक होतात आणि लोकांना मारहाण करतात.'
स्वामी पुढे म्हणाले की, 'लोकांना त्यांच्या या आजाराबद्दल माहिती असलं पाहिजे. प्रियांका गांधी यांचं स्वत: वरील नियंत्रण कधीही सुटू शकतं, ते कुणालाही कळणार नाही.'
याआधीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातले मंत्री आणि भाजपचे नेते विनोद नारायण झा यांनीही अकलेचे तारे तोडले आहेत.
प्रियांका गांधी यांच्यावर टीका करताना त्यांनी पातळी सोडून टीका केली होती. ते म्हणाले, 'प्रियांका या फक्त सुंदर आहेत. बाकी त्याचं कर्तृत्त्व काहीही नाही. राजकारणात फक्त सुंदर असण्यामुळे मतं मिळत नाहीत.' झा फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्याही पुढे जाऊन ते म्हणाले, 'प्रियांका यांची ओळख ही त्या रॉबर्ट वड्रा यांच्या पत्नी आहेत, ही सुद्धा आहे. रॉबर्ट हे अनेक जमीन घोटाळ्यात अडकले असून त्या घोटाळ्यातले आरोपी आहेत.'
========================