प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली, 31 मार्च : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांनी त्याबाबत निर्णय न घेतल्याने उमेदवारीबाबत अद्याप ठरलेलं नाही. वाराणसीसह 3 मतदारसंघांसाठी त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला आहे.
लखनौ आणि अलाहाबाद हे अन्य दोन मतदारसंघ आहेत. या तिन्ही ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्याबाबत काँग्रेसचं ठरलं असलं तरी त्यावर आता प्रियांका गांधी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पक्षाने आदेश दिला तर नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार - प्रियांका गांधी
काँग्रेसने आदेश दिला तर मी वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध लढायला तयार आहे, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटलं होतं. प्रियांका गांधींनी अयोध्येत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला कोण गेलं होतं, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
प्रियांका गांधींनी सक्रिय राजकारणात एन्ट्री घेतल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्ते त्यांनी निवडणूक लढावी म्हणून त्यांना आग्रह करत आहेत. रायबरेलीमध्ये अशाच एका चर्चेच्या वेळी कार्यकर्ते त्यांना निवडणूक लढवण्याची गळ घालत होते. त्यावेळी, निवडणूक लढवायचीच असेल तर ती वाराणसीमधून का नको ? असा सवाल प्रियांका गांधींनी विचारला आणि लगेचच तर्क-वितर्कांना उधाण आलं.
उत्तर प्रदेशात वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. म्हणूनच वाराणसीमध्ये मोदी विरुद्ध प्रियांका गांधी अशी लढत असणार का, असाही प्रश्न विचारला गेला. सोशल मीडियावर या चर्चेला आणखीनच वेग आला.
वाराणसीमधून नरेंद्र मोदींच्या विरोधात काँग्रेस आणि सपा- बसपा आघाडीने अजून उमेदवार उभा केलेला नाही. त्यामुळेच प्रियांका काँग्रेसतर्फे इथून मोदींना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यात आता आणखी 2 मतदारसंघाची नाव समोर आली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगला होता. यात काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचं नाव एवढं पुढे आलं नव्हतं. पण या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
आणखी उमेदवार कोण ?
आता यावेळी मोदींच्या विरोधात कोण याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. प्रियांका गांधी यावेळी काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी आहे. सपा-बसपाची आघाडी आणि सत्ताधारी भाजप यांच्याशी त्या कसा सामना करतात ते पाहावं लागेल.
VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Elections 2019, Lok Sabha Elections 2019, Priyanka gandhi